बिग ब्रेकिंग : राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही बंद राहणार | पुढारी

बिग ब्रेकिंग : राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही बंद राहणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहतील.

शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. जारी करण्यात आलेली नियमावलीमध्ये शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी आहे. मुंबई लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

  • उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू.
  • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू
  • मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार
  • रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू
  • २ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ
  • राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  • खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी
  • खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील
  • लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी
  •  हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  • स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा
  • २४ तास सुरु राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत
  • दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई
  • राज्यात प्रवेश करताना लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
  • दुकाने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन्ही डोस बंधनकारक.

राज्यातील 15 हून अधिक मंत्री तर जवळपास 100 आमदारांना कोरोना

राज्यातील 15 हून अधिक मंत्री तर जवळपास 100 आमदारांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याने या आठवड्यातील होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली होती.

डझनभराहून अधिक मंत्र्यांना संसर्ग झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी सचिव, ओएसडी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी, मंत्रालयातील इतर अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सुरक्षारक्षक यांनाही कोरोना बाधा झाल्याचे चित्र आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 जणांना कोरोना झाला आहे. आणखी 15 कर्मचार्‍यांचे अहवाल येणे बाकी आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 20 हून अधिक कर्मचार्‍यांना संसर्ग झाला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह इतर मंत्र्यांच्या कार्यालयातही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

688 पोलिसांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस पुन्हा वाढत असतानाच गेल्या सात दिवसांत राज्य पोलीस दलातील 185 अधिकारी आणि 501 अंमलदार अशा एकूण 688 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच पोलीस दल रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालत बंदोबस्तासह कोरोनासंबंधी देण्यात आलेली सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडत आहेत.

सतत नागरिकांच्या संपर्कात आल्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात आतापर्यंत 47 हजार 114 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील 500 पोलिसांचा या रोगाने बळी घेतला आहे, तर राज्यात सध्या 794 पोलीस सक्रिय रुग्ण म्हणून उपचार घेत असून 8 हजार 846 पोलीस विलगीकरणात उपचार घेत आहेत.

राज्यातील अन्य आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस दलांच्या तुलनेत मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांना आतापर्यंत आलेल्या तिन्ही लाटांमध्ये सर्वात जास्त फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलातील 22 अधिकारी आणि 47 अंमलदार अशा एकूण 69 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालये आणि विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

Back to top button