नाथाभाऊ हेसुद्धा बावन्न कशी सोने : अजित पवार | पुढारी

नाथाभाऊ हेसुद्धा बावन्न कशी सोने : अजित पवार

जळगाव, पुढारी ऑनलाईन : “जळगाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. विशेष करून जळगावचे सोने हे 52 कशीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सोन्याची किंमत प्रत्येकालाच कळते असे नाही. जळगाव तसेच खानदेश नेते नाथाभाऊ हेसुद्धा बावन काशी सोने आहे, त्यांची किंमत राष्ट्रवादीला जाणली आणि ते आमच्या खातर राष्ट्रवादीत आले, त्याचा आम्हाला अभिमान आहे”, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना मांडले.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुसावळ नगरपरिषदच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भुसावळ येथील डी. एस. हायस्कूल प्रागंणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ राव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, आ. अनिल भाईदास पाटील, अरुण भाई गुजराथी  माजी आ. गुलाबराव देवकर, डॉ. सतिष अण्णा पाटील, रोहिणी खेवलकर खडसे, विजय मोतीराम चौधरी, माजी आ. जगदीश वळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुसावळ नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबतच रावेर फैजपूर सावदा या ठिकाणी अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे खास करून येथील सोने बावन्न कशी आहे, त्याचप्रमाणे नाथाभाऊ सुद्धा बावनकशी सोने आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना नाथा भाऊंनी आणि आपण सर्वांनी मिळून न्याय देण्याची व संधी देण्याची जबाबदारी घेऊ या. एका पक्षाला नाथमुनी सर्वदूर पोहोचण्यासाठी सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम केले आहे. त्यांच्याबरोबर जीवाभावाची सहकारी आहेत त्यांनाही येत्या काळात आपण जबाबदारी देऊया.”

“मागच्या काळात जिल्ह्यात सहा आमदार होते. या वेळेस राष्ट्रवादीला थोडासा फटका बसला तसेच खानदेशातही फटका  बसला. जर नाथाभाऊ यांनी विधान परिषदेच्या पूर्वी हा निर्णय घेतला असता तर जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात वेगळे चित्र असते. जळगाव जिल्ह्याची परिस्थितीही बदलली असती मात्र काही गोष्टी वेळेस घडलेल्या चांगले असतात. त्याच पद्धतीने आज चांगले घडत आहे. मागचे करत न बसता उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत काही अनुभवी लोक पक्षात ताकद देऊन पुढे नेण्याचे काम करूया”, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

“ज्या पक्षाला नाथा भाऊंनी वाढवले, बहुजनांतपर्यंत पोहोचले, त्याच वातावरणात त्या पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. खोटेनाटे आरोप करून वेगळ्या चौकशा लावल्या. यापूर्वी असे महाराष्ट्रात कधीच घडत नव्हते. यशवंतराव चव्हाणांपासून तर आजपर्यंत विरोधकांना त्रास देण्याचे काम घडले नव्हते ते आज घडत आहे. मात्र ते विसरता हे चार दिवस सासूचे असतात, त्याचप्रमाणे चार दिवस सुनेचे पण येत असतात. कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही”, असाही टोला यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना लगावला.

हे वाचलंत का? 

Back to top button