leopard fight : पुण्यात दोन बिबट्यांच्या थरारक झुंझीत एकाचा मृत्यू, स्थानिक शेतकऱ्याने बघितली प्रत्यक्ष झुंज
आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गावालगतच्या शेतात बिबट्या अचानक समोर येणं ही नागरिकांसाठी सामान्य गोष्ट आहे. मात्र तुमच्यासमोर बिबट्यांची झुंज झाली आणि त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला असाच काहीसा प्रसंग आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथील नागरिकांनी अनुभवला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. (leopard fight)
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावे बिबट प्रवण क्षेत्रात आहे. या गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. दिवसाढवळ्याही मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन परिसरात होते. बिबट प्रवण क्षेत्र असल्याने बिबट्यांच्या संघर्षात वाढ झाली आहे. आपल्या क्षेत्रात अधिराज्य असण्यासाठी अनेकदा दोन बिबट्यांमध्ये झटापट होते आणि यात कमकुवत बिबट्याचा मृत्यू होतो.
leopard fight : जो थरार होता तो शब्दांच्या पलिकडे
शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथील शेतशिवारात स्थानिक शेतकरी उत्तम लाड यांनी दोन बिबट्यांची झुंज पहिली. त्यांना जो काही थरार अनुभवायला मिळाला तो शब्दांच्या पलीकडला होता. यामध्ये एका लहान अडीच ते तीन वर्षांच्या मादीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या शरीरावर जखमा होत्या.
तसेच त्याचे पोट, मान व पायाचे लचके बिबट्याने तोडले होते. तर दुसऱ्या बिबट्याने शेजारील उसात धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यावेळी त्याच्यासमवेत बारकु गडगे, सुहास गडगे, संतोष गडगे, उद्धव लाड, उत्तम लाड उपस्थित होते.
भागात बिबट्यांच्या संख्येत वाढ
दरम्यान जुन्नर पूर्व भागात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना परिसर अपुरा पडू लागले आहे.
त्यातच उसाची तोडणी सुरु आहे, अशावेळी बिबट्या आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी इतर बिबट्यांशी लढतात. ही घटनादेखील याच प्रकारची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

