shekhar gaikwad : एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : साखर आयुक्त शेखर गायकवाड | पुढारी

shekhar gaikwad : एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : साखर आयुक्त शेखर गायकवाड

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केलेली आहे, त्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित एफआरपी द्यावी लागेल. असे स्पष्ट करत एफआरपी मोडणार्‍या साखर कारखान्यांवर त्वरीत कारवाई करू, असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दिले. (shekhar gaikwad)

चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बेकायदेशीर रित्या एफआरपीचे तुकडे केलेले आहेत. तसेच इथेनॉल निर्मितीमुळे अनेक साखर कारखान्यांची साखर उतारा कमी झाला आहे. याचा परिणाम उसाच्या ‘एफआरपी’वर झाला आहे.

shekhar gaikwad : राजू शेट्टी यांची साखर आयुक्तालयात भेट

यासंदर्भात राजू शेट्टी यांनी आज पुणे येथील कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. त्यांच्यावर त्वरीत ‘आरआरसी’ची कारवाई करण्यात यावी.

त्या शेतकर्‍यांना व्याजासहित पैसे वसूल करून द्यावेत. तसेच राज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट बी हेवी मोलॅसीस, इथेनॉलची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा उतारा कमी झाला आहे. संबंधीत साखर कारखान्यांची यादी प्रकाशीत करण्यात यावी. जेणेकरून शेतकर्‍यांना वाढीव एफआरपी मिळू शकेल.

१५ टक्के व्याजासहित पैसे वसूल करणार

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची तुकडे केले आहेत, त्या कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित उर्वरीत एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना द्यावीच लागेल. संबधित सर्व शेतकर्‍यांनी तक्रारी कराव्यात.

त्यांचे पैसे व्याजासहित वसूल करून देऊ. तसेच उसाच्या रसापासून बी हेवी मोलॅसीस व इथेनॉल निर्मिती केलेल्या साखर कारखान्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ती यादी तुम्हाला सुपुर्द केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

Back to top button