हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासाठी सर्व फॉर्मेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजन (T Natarajan) याच्या गावात क्रिकेटचे मैदान बांधले जात आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर नटराजनने टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान मिळवले. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचे नशीब इतके चांगले होते की त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधीही मिळाली. या प्रचंड यशानंतर त्याने आपल्या गावातील लोकांसाठी क्रिकेटचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानात सर्व सुविधा उपलब्ध असतील अशी माहिती मिळत आहे.
टी नटराजन (T Natarajan) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. फोटो अपलोड करताना त्याने लिहिले की, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी माझ्या गावात एक नवीन क्रिकेट मैदान बांधणार आहे, ज्याचे नाव नटराजन क्रिकेट ग्राउंड (NCG) असेल. प्रत्येकाची स्वप्ने सत्यात उतरतात आणि गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मी टीम इंडियासाठी पदार्पण केले होते आणि यावर्षी मी डिसेंबर महिन्यातच हे मैदान तयार करत आहे.
दुखापतीमुळे नटराजन (T Natarajan) क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना या वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमधील दोन सामन्यांमध्येही दिसला आणि अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले.
टी नटराजनने (T Natarajan) भारतासाठी १ कसोटी, २ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत ३, वनदेत ३ विकेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षी जानेवारीत झालेल्या ब्रिसबेन कसोटी सामन्यात भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. टी नटराजनने या सामन्यात पदार्पण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.