पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय क्रिकेट विश्वात विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय, विराट विरुद्ध सौरभ गांगुली (sourav ganguly captaincy) अशा वादांमुळे चर्चेत आहे. दिवसेंदिवस या प्रकरणी नवनवे खुलासे समोर येत आहेत. गेल्या काही आठवड्यात विराट कोहलीला अनेक धक्के बसले आहेत. त्याच्याकडून प्रथम एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलल्यानंतर तो बीसीसीआयशी वादात सापडला.
या सगळ्यात एका बाजूला विराट कोहली तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly captaincy) आहे. अशाप्रकारे विराटला अचानक कर्णधारपदावरून हटवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, पण विराटला हटवण्यात सर्वात मोठा हात मानल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वतःचे कर्णधारपदही 2005 मध्ये अचानक हिसकावण्यात आले. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये रस असेल तर तुम्ही प्रसिद्ध चॅपल-गांगुली वादाबद्दल ऐकले-वाचले असेल. हा वाद काय होता आणि आज विराट कोहलीची परिस्थिती आणि त्यावेळी सौरव गांगुलीची परिस्थिती जवळपास सारखीच का आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
२००५ मध्ये, ग्रेग चॅपल प्रशिक्षक बनले आणि गांगुलीचे (sourav ganguly captaincy) एकदिवसीय कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले. आज ज्या प्रकारे कोहलीचे एकदिवसीय कर्णधारपद गमावले आणि रोहित शर्माला कर्णधार बनवले, त्याच पद्धतीने २००५ मध्ये सौरव गांगुलीचे कर्णधारपद हिसकावून राहुल द्रविडला कर्णधार बनवण्यात आले. हे सर्व आजपासून जवळपास १६ वर्षांपूर्वी घडले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
ग्रेग चॅपेल प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच तिरंगी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला गेला होता. योगायोगाने या मालिकेपूर्वी भारताने पाकिस्तानसोबत एक मालिका खेळली होती, ज्यामध्ये गांगुलीवर स्लो ओव्हर रेटमुळे ६ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर, गांगुली चॅपेलच्या प्रशिक्षणाखालील पहिल्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता, त्यानंतर राहुल द्रविडला तिरंगी मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्याप्रमाणे विराट कोहलीवर आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचे दडपण आहे त्याचप्रमाणे २००० आणि २००३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या पराभवानंतर गांगुलीवरही दबाव होता.
तिरंगी मालिका संपल्यानंतर गांगुलीचे (Sourav Ganguly) निलंबन संपले आणि त्यानंतरच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले.
सध्या विराटला गेल्या दोन वर्षांपासून शतक झळकावता आलेले नाही. त्याचप्रमाणे त्यावेळी गांगुलीही खराब फॉर्मशी झुंजत होता. दोन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून एकही कसोटी शतक झळकले नव्हते. प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी त्याला झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी कर्णधारपद सोडून आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ग्रेग चॅपलने गांगुलीला तयार केलेल्या संघात विश्रांती दिली. यामुळे संतापलेल्या गांगुलीने आपली बॅग भरली आणि भारतात परतण्याची तयारी सुरू केली. गांगुलीला राग आल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला.
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर सौरभ गांगुली ग्रेग चॅपल यांचे नाव न घेता उघडपणे मीडियासमोर आला. या पत्रकार परिषदेत गांगुली आक्रमक झाला होता. त्याने थेट आरोप करण्यास सुरू केले. संघ व्यवस्थापनाचे काही अधिकारी त्याच्यावर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकत असल्याचे धक्कादायक विधान त्याने त्यावेळी केले. या नंतर भारतीय क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली.
झिम्बाब्वे दौरा संपल्यावर चॅपलने बीसीसीआयला एक ई-मेल केला. ज्यामध्ये गांगुली आता भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी योग्य नाही. त्याच्या या वागण्याने भारताचे २००७ च्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रेग चॅपल यांचा हा ई-मेल लीक झाला आणि भांडण चव्हाट्यावर आले.
सात सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात आला होता.या मालिकेपूर्वी गांगुली जखमी झाला होता, राहुल द्रविडला कर्णधार बनवण्यात आले होते. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले चार सामने जिंकले, त्यानंतर गांगुली तंदुरुस्त झाला पण तरीही त्याला संघात स्थान मिळाले नाही आणि भारताने श्रीलंकेचा ६-१ असा पराभव केला.
यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय मालिका खेळायची होती. यामध्येही सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) संघात निवड झाली नाही. या मालिकेतील चौथा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता. या मैदानात चाहत्यांनी गांगुलीचा जयघोष केला. तर चॅपेल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची होती. या मालिकेत बीसीसीआयने झहीर खानला हटवून सौरव गांगुलीला स्थान दिले. गांगुलीच्या पुनरागमनानंतर बीसीसीआयनेही आता राहुल द्रविड कसोटीत कर्णधार आणि वीरेंद्र सेहवाग उपकर्णधार असेल असे जाहीर केले. गांगुली या मालिकेतील पहिले दोन सामने खेळला पण तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. गांगुलीच्या एक्झिटमुळे कोलकात्यात चाहते रस्त्यावर उतरले आणि गांगुलीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले.
यानंतर गांगुली संघात आणि बाहेर जात राहिला. २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर गांगुलीचा पुन्हा कसोटी संघात समावेश करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला पण गांगुली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. यानंतर गांगुली फॉर्ममध्ये परतला आणि त्याने चांगली कामगिरी केली. २००७ च्या विश्वचषकात भारताचा दणदणीत पराभव झाला, पण गांगुलीने चांगली कामगिरी केली. भारताच्या या पराभवाने चाहत्यांनी ग्रेग चॅपलविरोधात आघाडी उघडली. यानंतर ग्रेग चॅपल यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गांगुलीने १५ नोव्हेंवर २००७ रोजी वनडे आणि ६ नोव्हेंबर २००८ रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.