Jalgaon Lok Sabha | आखाजीची संक्रांत, सलग सुट्ट्यांचा मतदानावर होणार परिणाम ! | पुढारी

Jalgaon Lok Sabha | आखाजीची संक्रांत, सलग सुट्ट्यांचा मतदानावर होणार परिणाम !

जळगाव, नरेंद्र पाटील- लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन आपापल्या परीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. जळगाव जिल्ह्यात 13 तारखेला मतदान पार पडणार आहे. मात्र, अकरा व बारा या दोन दिवस शासकीय सुट्या त्यानंतर सोमवारी 13 मे ला मतदान आहे. त्यात दहा तारखेला अक्षय तृतीया असल्याने अनेक सरकारी कर्मचारी सुट्टी किंवा अर्ध्या दिवसाची रजा घेतील. त्यामूळे 13 मेला मतदानासाठी नागरिक मतदान करण्यासाठी येणार की नाही याबद्दल शाशंकता निर्माण झाली आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 42 ते 43 अंशावर गेलेले असल्याने दुपारी मतदान कमी होण्याची शक्यता आहे.

लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदान करून आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे तिथे लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात 13 मेला मतदान दोन्ही लोकसभेसाठी होणार आहे. यामध्ये 10 मे ला आखजी हा सण आहे. जरी जिल्हाधिकाऱ्यांनी या दिवशी सुट्टी जाहीर केलेली नसली तरी या दिवशी प्रत्येकाच्या घरात घागर भरली जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य सर्व एकत्र आलेले असतात. त्यानंतर शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टीचे आलेला आहे. शासकीय कर्मचारी यांना हे दोन दिवस सुट्टीचे असतात. त्यामुळे शुक्रवारी जरी सुट्टी जाहीर झालेली नसली तरी अनेक जण रजा टाकून किंवा अर्धा दिवस आपले काम करून परिवारासोबत विकेंड साजरा करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात व तसेच सोमवारी मतदान असल्याने तोही सुट्टीचा दिवस त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाढत्या तापमानाचा परिणाम

त्यामध्येच एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे तापमान हे 45 अंशापर्यंत गेलेले आहे. सध्याला जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 42, 43 अंश असे तापमान सुरू आहे. या तापमानात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर निघणे अशक्य होते. अशा तापमानात नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगेत उभे राहणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रत्येक केंद्रावरुन लाईव्ह प्रक्षेपण

यावर पर्याय म्हणून जळगाव जिल्हा प्रशासन आपल्या पेजवरून प्रत्येक बूथ केंद्रावर मतदानासाठी मतदारांची किती मोठी लाईन आहे याचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे नागरिकांना किती मोठी लाईन आहे व मतदानासाठी किती वेळ लागू शकतो. तसेच आपल्याला किती वेळ उभे राहावे लागेल याचा अंदाज येऊ शकेल. मात्र असे जरी असले तरी उन्हामध्ये नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडतील का हा मोठा प्रश्न आहे. जिल्हाप्रशासनासह लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या समोरही हा प्रश्न उभा राहिला आहे.

हेही वाचा –

Back to top button