पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊ लागल्याने भाजप महायुतीकडून शहरात विविध नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. महायुतीचे पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. भाजप महायुतीच्या प्रचारासंदर्भात माहिती देताना प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, निवडणूक प्रचाराची सांगता 11 मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 'घर चलो अभियान' सुरू केले आहे. पक्षाचे सात हजार कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करत आहेत.
तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'नमो संवाद संमेलन' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. शहरात 650 ठिकाणी कोपरा सभा आयोजित केल्या जाणार आहेत. यापैकी काही सभा पार पडल्या आहेत. विविध समाजबांधवांचे 55 हून अधिक मेळावे घेण्यात येत आहेत. पक्षाच्या वतीने एका अॅपच्या माध्यमातून युवकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या असून सुमारे 71 हजार 600 युवक, युवतींशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली आहे. त्याआधारे युवकांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्याही सभा होणार आहेत. या सभांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच जाहीर केले जाईल, असे पांडे यांनी नमूद केले.
हेही वाचा