Jalgaon Crime : दोन बांगड्यांसाठी मालकिणीचा खून, टॉयलेटमध्ये लपून बसलेल्या नोकराला अटक | पुढारी

Jalgaon Crime : दोन बांगड्यांसाठी मालकिणीचा खून, टॉयलेटमध्ये लपून बसलेल्या नोकराला अटक

जळगाव : मुंबईच्या मलबार हिल येथे राहणाऱ्या आपल्या मालकिणीचा खून करून रेल्वेने पळून जात असताना संशयित खूनी नोकराला रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांनी अटक केली आहे. आपल्या मालकिणीच्या तीन लाख रुपये किमतीच्या बांगड्यांसाठी त्याने मालकिणीचा खून करुन तो या बांगड्या चोरून घेऊन चालला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती मुकेश शहा, वय ६७ या तारीया हाईट्स ६६ नेनिअन्सी रोड, मलबार हिल मुंबई येथे राहत होत्या. तर, मुळचा बिहार राज्यातील कन्हैयाकुमार संजय पंडीत हा त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता. त्याने (दि. 11) रोजी मालकिणीचा गळा दाबुन खून केला. मालकिणीच्या हातातील हिरे जडीत दोन सोन्याच्या बांगडया ज्यांची किंमत तीन लाख रुपये इतकी आहे. त्या घेऊन तो पसार झाला. दरम्यान तो, मुंबई येथून ट्रेनने गावाकडे जात असल्याची माहिती त्याच्या फोटोसह मिळाली. त्याच्या शोधासाठी रेल्वे स्टेशन भुसावळ येथे आसनसोल एक्सप्रेस आल्यावर संपुर्ण ट्रेन चेक करण्यात आली परंतु फोटो मधील संशयित आरोपी हा मिळून आला नाही. रेल्वे स्टेशन भुसावळ येथे लागलीच रक्सोल एक्सप्रेस आली. त्यावेळी ट्रेन चेक करण्यात आली परंतु त्यातही फोटो मधील संशयित आरोपी दिसुन आला नाही. ट्रेन रेल्वे स्टेशन भुसावळ येथुन निघाल्यानंतर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे अंमलदारांना संशय आल्याने व ट्रेनचा थांबा पुढे खंडवा असल्याने सर्वांनी खंडव्या पर्यंत जावून ट्रेन चेक करण्याचे ठरवले व स्टाफ ट्रेनमध्ये चढला.

 संडास मध्ये बसला होता लपून

दरम्यान ट्रेन मध्ये पोलीस अंमलदार यांना एक संडास ब-याच वेळ पासुन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी तेथेच सापळा लावला व संशयित आरोपी संडासमधून बाहेर येताच त्याला ताब्यात घेतलं. रक्सोल एक्सप्रेसला झेडटीएस जवळ सिग्नल न मिळाल्याने ट्रेन थांबली. रेल्वे पोलीस अंमलदार त्या आरोपीस ताब्यात घेवुन ट्रेन मधुन खाली उतरले व रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ येथे आले. संशयितास पो. ठाणे मरबालहिल बृहमुंबई शहर येथील तपास पथकाच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

अधिकारी एपीआय.बी.एस. मगरे, पोउपनिरी. सुनिल इंगळे व गुन्हे शोध पथकातील पोहवा/दिवानसिंग राजपुत, पोहवा/धनराज लुले, पोना/विशाल चौधरी, पोकों/बाबु मिर्झा, पोकों/जाधव तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक इमरान खान, आरक्षक महेंद्र कुशवाह यांनी कारवाई केली.

हेही वाचा ;

Back to top button