Sharad Pawar vs Ajit Pawar | अजित पवारांना धक्का! ‘घड्याळ’ चिन्ह बदलणार, प्रचाराच्या पोस्टर्समध्ये शरद पवारांचा फोटोही वापरण्यास मनाई | पुढारी

Sharad Pawar vs Ajit Pawar | अजित पवारांना धक्का! 'घड्याळ' चिन्ह बदलणार, प्रचाराच्या पोस्टर्समध्ये शरद पवारांचा फोटोही वापरण्यास मनाई

पुढारी ऑनलाईन : अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी (NCP) म्हणून मान्यता देण्याच्या भारताच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवारांची बाजू मांडली. यावेळी सिंघवी यांनी निवडणूक प्रचारातील काही पोस्टर्स न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ज्यावर शरद पवारांचा फोटो आहे. त्यावर न्यायालयाने, प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो का वापरता? अशी विचारणा अजित पवार गटाला केली.

“तुम्ही त्यांचे (शरद पवारांचे) नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरणार नाही असे बिनशर्त प्रतिज्ञापत्र द्या,” असे सांगत न्यायालयाने अजित पवार गटाला सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिले. त्या पाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा निर्णयदेखील अजित पवारांच्या बाजूने लागला. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होत असताना “शरद पवारांचा फोटो का वापरता? तुम्ही एक स्वतंत्र पक्ष आहात” अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान टोचले. “जर तुम्हाला शरद पवारांसोबत राहायचे नाही असा निर्णय तुम्ही घेतला आहे, तर मग त्यांचा फोटो का वापरता? तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा,” अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना अजित पवार यांच्या पक्षाने स्वतंत्र चिन्ह घ्यावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. याबाबत शरद पवार यांचा फोटोही अजित पवार गटाच्या सदस्यांनी वापरू नये असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. यामुळे अजित पवार गटाला स्वतंत्र चिन्ह घ्यावे लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या मध्यात जर काही निर्णय झाला तर अडचणी येऊ शकते. त्यामुळे अजित पवार गटाने स्वतंत्र चिन्ह घ्यावे, असे आम्ही सुचवीत आहोत. याबाबत तुम्ही विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले.

घड्याळ आणि शरद पवार यांचे छायाचित्र कसे वापरता येईल? ही तर फसवणूक आहे. याचा उपयोग ग्रामीण भागात त्यांच्या फायद्यासाठी होईल, असे तुमचे नेते सांगतात. माझ्याकडे एक नवीन चिन्ह आहे. त्यांना घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरू द्या. घड्याळाचा शरद पवारांच्या ओळखीशी अतूट संबंध आहे, असे सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले.

समजा तुमच्याकडे तुमच्या आवडीचे चिन्ह आहे. त्यांना आधीच चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह तुम्ही कोणत्याही निवडणुकीत वापरू शकता. यामुळे विनाव्यत्यय, तंटामुक्त प्रक्रिया असेल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सूचित केले.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचे दोन स्वतंत्र पक्ष असताना दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या फोटोचा नावाचा वापर करणे चूक आहे. हा मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न आहे, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणावरील सुनावणी पुन्हा एकदा येत्या मंगळवारी (१९ मार्च) होणार आहे.

न्यायालयात काय घडले?

अजित पवार गटाच्या वतीने माझा फोटो वापरला जातो, अशा पद्धतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांच्या माध्यमातून शरद पवारांनी दाखल केला होता. त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा फोटो वापरण्याचे आवाहन केले होते. यावर आजच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने नाराजी व्यक्त करत “निवडणुकीच्या वेळीच तुम्हाला शरद पवार आठवतात आणि तुम्ही त्यांचा फोटो वापरता,” अशी तंबी देतानाच अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला तुमचे घड्याळ चिन्ह काढून घ्यावे लागेल.” त्यानंतर “आम्ही दोन दिवसात शरद पवारांचे नाव, फोटो वापरणार नाही” असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला देणार असल्याचे अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी आणि मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने अजित पवार गटाचे हे म्हणणे ऐकून घेत शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा :

Back to top button