Nashik | सिंहस्थातून नाशिक-त्र्यंबकचा चेहरामोहरा बदलू! | पुढारी

Nashik | सिंहस्थातून नाशिक-त्र्यंबकचा चेहरामोहरा बदलू!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

२०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊन विरोधी पक्षनेता झालो नसतो तर, दत्तक पिता काय काम करू शकतो हे नाशिककरांना दाखवून दिले असते, अशा शब्दांत नाशिककरांप्रती कर्तव्य भावना व्यक्त करत २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलला जाईल. त्यासंदर्भातील सिंहस्थ आराखडा गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तातडीने तयार करून राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेसाठी सादर करावा. सिंहस्थासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जितका निधी लागेल तितका उपलब्ध करून दिला जाईल. किंबहुना, जुलै २०२४ मध्ये येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सिंहस्थ कामांसाठी भरीव तरतूद केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना दिली.

आ. देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या राज्यातील पहिल्या वातानुकुलित मेळा बसस्थानकासह शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शनिवारी(दि.१०) उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मेळा बसस्थानकाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अन्न, नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खा. हेमंत गोडसे, आ. फरांदे, आ. ॲड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, नाशिकची भूमी वंदनीय आहे. प्रभू श्रीरामांचे वनवासातील सर्वाधिक काळ वास्तव्य याच भूमीत होते. त्यामुळे श्रीरामांची अयोध्यानगरी जितकी महत्त्वाची तितकीच नाशिकनगरी आहे. ही भूमी जप, तप, सामर्थ्याची भूमी आहे. हिंदुत्व सांगणाऱ्या सावरकरांचाही या भूमीशी संबंध आहे. त्यामुळेच अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ११ दिवसीय अनुष्ठानाची सुरूवात नाशिकमधून केली. २०२७मध्ये या भूमीत सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. गत सिंहस्थ निर्विघ्न पार पडला. गतसिंहस्थाच्या तुलनेत आगामी सिंहस्थात नाशिक व त्र्यंबकेश्वरला दुपटीने साधु-महंत व भाविक येतील. त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याकरीता ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री दादा भुसे यांच्या सह अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सिंहस्थ कामांचा समग्र विचार करून तातडीने प्रारूप आराखडा सादर करावा. सिंहस्थाच्या माध्यमातून आगामी तीन वर्षात नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. पुण्याच्या धर्तीवर नाशिकच्या बाह्यरिंगरोडचा विकास केला जाईल. या रिंगरोडची आखणी लवकरच केली जाईल. यामाध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आ. राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून पंचवटीत उभारण्यात येत असलेल्या श्रीरामांच्या ७० फुटी प्रतिमा नाशिकचे आकर्षण ठरेल. अटल स्वाभीमान भवनाच्या माध्यमातून दिव्यांगांना प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. आ. फरांदे यांनी प्रास्तविकात आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि बाह्यरिंगरोडसाठी निधीची मागणी केली. भुजबळ यांनी आरोग्य विद्यीपाठाचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला गती देण्याची मागणी केली. तर पालकमंत्री दादा भुसे सिंहस्थ आराखडा लवकरच तयार केला जाईल, असे सांगितले.

नाशिकची निओ मेट्रो लवकरच
नाशिकमध्ये पारंपरिक मेट्रो प्रकल्प राबविणे व्यवहार्य नाही. नाशिकच्या निओ मेट्रोचा आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यासाठी समिती गठीत केली असून नाशिकसह देशातील पंधरा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याची केंद्राला विनंती करण्यात आली असून त्यासाठी प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य शासनाने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. आराखडा निश्चित होताच निओ मेट्रोचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

त्यांच्या पोटदुखीचा इलाज लवकरच करू!
पहाटेचा शपथविधी झाला त्याचवेळेस छगन भुजबळ सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्षे त्यांना ताटकळत बसावे लागले नसते, या गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राज्यात बंद दाराआड घरात बसून बैठका घेणारे नव्हे तर, जनतेमध्ये जाणारे मजबूत, काम करणारे आणि जनसामान्यांच्या भावना समजून घेणारे सरकार आले आहे, अशी टीका करत ज्यांना घरी बसून पोटदुखी झाली आहे. त्यांच्या पोटदुखीचा लवकरच इलाज केला जाईल, असा गर्भित इशाराही फडणवीस यांनी ठाकरे यांचे नाव न घेता दिला.

नाशिक-पुणे रेल्वे आता शिर्डीमार्गे
नाशिक-पुणे फास्ट रेल्वेमार्गाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा झाली असून, या मार्गावरील बोगद्यांमुळे या प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्यायी रेल्वेमार्गाचा विचार केंद्राकडून सुरू आहे. नवीन मार्गामुळे नाशिक-पुण्याचे अंतर ३३ किलोमीटरने वाढणार असले तरी, या मार्गाचा नाशिक, पुण्यासह शिर्डीला देखील फायदा होईल. अधिकाधिक प्रवाशी मिळणे सुकर होईल. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. यामाध्यमातून नाशिक-पुणे अंतर दोन तासात गाठणे शक्य होईल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही वाचा:

Back to top button