नवले पूल परिसरात अपघातांची मालिका : टँकरची आठ वाहनांना धडक | पुढारी

नवले पूल परिसरात अपघातांची मालिका : टँकरची आठ वाहनांना धडक

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. बाह्यवळण मार्गावरून टँकर दुपारी चारच्या सुमारास निघाला होता. टँकरचालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने एकापाठोपाठ सात ते आठ वाहनांना धडक दिली. अपघातात मोटारींचे नुकसान झाले.

घटनेची माहिती समजताच सिंहगड वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढमे, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजेश गोसावी, दत्तनगर मार्शल प्रकाश शिंदे, बालाजी पांचाळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला काढण्यात आली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. मुठू कुमार (34 वर्षे) ,रा. तामिळनाडू, यास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

Back to top button