मेट्रोला प्रतिक्षा पंतप्रधानांच्या वेळेची; 100 टक्के काम पूर्ण

मेट्रोला प्रतिक्षा पंतप्रधानांच्या वेळेची; 100 टक्के काम पूर्ण

पुणे : पुण्यातील मेट्रोच्या दोन मार्गांपैकी पहिला मार्ग उद्घाटनासाठी सज्ज झाला असून, येत्या काही दिवसांतच कोथरूडकरांना थेट नगर रस्त्यावरील रामवाडी गाठता येईल, तर नगर रस्त्यावरील रहिवाशांनाही शिवाजीनगर परिसरापासून ते कोथरूडपर्यंत पोहचता येणार आहे. आता पुणेकर वाट पाहताहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी वेळ देण्याची…

पुण्यात मेट्रो धावावी आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे सुखकर प्रवास करता यावा, हे पुणेकरांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची घटिका समीप येऊन पोहचली आहे. मेट्रोच्या आखणीपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईपर्यंतचा प्रवास खडतर होता. मात्र, एकदा काम सुरू झाल्यावर दररोजचे काटेकोर वेळापत्रक आखले गेले आणि गतीने काम पुढे सरकत गेले. शेवटच्या टप्प्यात या प्रकल्पाने अपेक्षेपेक्षा थोडा-अधिक वेळ घेतला असला, तरी एकुणातच प्रकल्पाची गती समाधानकारक अशीच राहिली. पुण्यात मेट्रोचे मार्ग कसे असावेत, याचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयार केला.

त्या प्रकल्प अहवालामध्ये सुरुवातीला सहा मार्ग सुचविण्यात आले होते. त्यातील 2021 आणि 2031 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सर्वाधिक रहदारी असणार्‍या दोन मार्गांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली. त्यात कात्रज ते निगडी आणि पौड फाटा रस्त्यावरील वनाज कंपनी ते नगर रस्त्यावरील रामवाडी यांचा समावेश होता. त्यातील वनाज ते रामवाडी हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्थानकाचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून, हा टप्पा येत्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याच्या प्रतीक्षेत आहे. सातार्‍यातील नियोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान सातार्‍यामध्ये असणार आहेत.

त्याचवेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील नवीन विमानतळ टर्मिनल आणि मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटन व्हावे, याकरिता सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच विमानतळ अधिकारी आणि मेट्रो अधिकार्‍यांना देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी इच्छा आहे. परंतु, नियोजित कार्यक्रमामुळे पुण्यातील या दोन ठिकाणांच्या उद्घाटनाबाबत अद्याप निश्चितता नाही.

मेट्रोच्या टप्प्यांविषयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे (वनाज ते गरवारे-पिंपरी ते फुगेवाडी) उद्घाटन झाले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्याचे (गरवारे ते सिव्हिल कोर्ट – सिव्हिल कोर्ट ते फुगेवाडी) सुध्दा पंतप्रधानांच्याच हस्ते उद्घाटन झाले. आता तिसर्‍या टप्प्याचे (रुबी हॉल ते रामवाडी) याचेसुध्दा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी पुण्यातील राजकीय नेत्यांची इच्छा आहे. तर, चौथा टप्प्याचे (सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट) 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याची फिनिशिंग आणि एअर कंडिशनची कामे बाकी आहेत.

पीएमपीद्वारे विमानतळ कनेक्टिव्हिटी…

रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव विमानतळ, असा दोन किलोमीटरचा गॅप भरून विमान प्रवाशांना मेट्रोच्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता यावा, याकरिता मेट्रो पीएमपीसोबत मिळून रामवाडी ते लोहगाव विमानतळादरम्यान शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. यासंदर्भात बैठका सुरू आहेत. लवकरच पुणेकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

मेट्रोचा तिसरा टप्पा असलेल्या रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच, या टप्प्याचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या मार्गावर मेट्रोची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. आदेश मिळाल्यावर कधीही आम्ही हा मार्ग सुरू करू शकतो.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news