लष्कर परिसरात कारचा थरार; दहा दुचाकींना ठोकरले : तरुण गंभीर जखमी

लष्कर परिसरात कारचा थरार; दहा दुचाकींना ठोकरले : तरुण गंभीर जखमी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कर परिसरात एका आलिशान कारच्या चालकाला फिट आल्याने कारने तब्बल दहा दुचाकींना ठोकरले. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने इतर कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. हा थरार भरदुपारी तीनच्या सुमारास फॅशन रोड, जाफरीन लेन, लष्कर येथे घडला. या प्रकरणाची लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकीत छाजेड नावाच्या व्यक्तीची मर्सिडीज कार आहे. त्यावर रवींद्र धनवटे (वय 32, रा. अहमदनगर) हा चालक म्हणून काम करतो. तो छाजेड यांच्या मुलीला डान्सच्या क्लासला पोहचवून पुन्हा घरी परतत होता. या वेळी त्याला गाडीतच फिट आली असे त्याचे म्हणणे आहे. यामुळे गाडी तशीच सरळ पार्क केलेल्या वाहनांना धडकत पुढे गेली. गाडीने तब्बल दहा दुचाकींना धडका दिल्या. यानंतर गाडी थांबली.

मात्र, यामध्ये अतिक शौकतअली खत्री (29,रा. इंदौर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तर गाडीत फिट येऊन पडलेल्या धनवटे याला बाहेर काढून पाण्याचा मारा करत शुध्दीवर आणले. सुदैवाने गल्ली अरुंद असल्याने तसेच दुचाकी कडेला पार्क केलेल्या असल्याने कार नागरिकांच्या अंगावर गेली नाही. गाडीची धडक एवढी जोरात होती की दोन्ही एअर बॅग उघडल्या गेल्या. दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहने बाजूला उचलून ठेवली. तसेच गाडी मालकाशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर धडक देणारी गाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. संबंधित चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात घडल्याचे दिसून येते. दहा दुचाकींचे नुकसान झाले असून, एकजण जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, गाडी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– राजेंद्र मगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news