Nashik News I मालेगावमध्ये 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा | पुढारी

Nashik News I मालेगावमध्ये 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा

मालेगाव : नीलेश शिंपी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या नऊ महिन्यांपासून मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालावली असून, गावागावांना पाणीपुरवठा करणारे साठवण तलाव, उद्भव विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पर्यायाने बहुतांश गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी गेल्या वर्षी कजवाडे, वर्‍हाणे, सावकारीवाडी गावाला पाण्याचे पहिले टँकर 22 एप्रिल 2023 रोजी सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गावाची संख्या जसजशी वाढू लागली तसतशी पाण्याच्या टँकरची संख्यादेखील वाढली आहे. आजमितीस तालुक्यातील 17 गावे व 13 वाड्यांवरील 40 हजार 956 ग्रामस्थांची तहान 17 टँकरच्या माध्यमातून भागवली जात आहे.

गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्येच मालेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे कजवाडे, वर्‍हाणे व सावकारवाडी ग्रामपंचायतीने 19 एप्रिल 2023 रोजी ग्रामपंचायतीने पाणी टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. ते प्रस्ताव पंचायत समितीने तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवले होते. त्यानंतर या तिन्ही गावांना 22 एप्रिल 2023 पासून खासगी टँकर सुरू करण्यात आले. या गावांना 24 हजार लिटरच्या प्रत्येकी दोन फेर्‍यांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर मात्र उन्हाळ्यात गावांच्या संख्येत वाढच होत गेली. एरंडगावला 28 एप्रिल 2023, जळगाव (नि.) च्या सात वाड्यांसह ज्वार्डी बुद्रुक व नगाव दिगरला 5 मे 2023, मेहुणे 22 मे 2023, घोडेगाव 25 मे 2023, मांजरेच्या पवारवाडी व इंदिरानगर वाड्यांसाठी तसेच जळगाव (नि.) च्या काळेवाडी वस्तीसाठी 13 जून 2023 चोंढीच्या तीन वाड्यांसाठी व टाकळी गावासाठी 1 सप्टेंबर 2023, पोहाणे 25, शिरसोंडीला 27 ऑक्टोबर तर निंबायती व दुंधेला अनुक्रमे 25 व 26 नोव्हेंबर 2023 पासून पाण्याचे टँकर सुरू आहेत. या 17 गावे व 13 वाड्यांसाठी 17 खासगी टँकरच्या 35 फेर्‍या करून पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी 20 खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात तीन विहिरी गावासाठी, तर 17 विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. यातील काही गावांना एक, काहींना दोन तर मोठ्या गावांना टँकरच्या तीन फेर्‍यांद्वारे पाणी पुरवले जात आहेत. उन्हाळ्याच्या प्रारंभीच टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टँकरद्वारे फेर्‍यांचे नियोजन
ज्वार्डी बुद्रुक गावाला 24 हजार लिटर, तर काळेवाडी वस्तीला 12 हजार लिटरची प्रत्येकी 1 फेरी, कजवाडे, सावकारवाडी, वर्‍हाणे, एरंडगाव, जळगाव (नि.), नगाव दिगर, घोडेगाव, मांजरे, शिरसोंडी, पोहाणे, निंबायती व दुंधे या गावांना 24 हजार लिटरच्या प्रत्येकी 2 फेर्‍या तर मेहुणे, चोंढी, टाकळी या गावांना प्रत्येकी 24 हजार लिटरच्या 3 फेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जयदिप देवरे (खाकुर्डी), मोठाभाऊ शेलार, सुनंदा शेलार, सागर पाटील, रतिलाल शेलार, सतिष पाटील, शरद शेलार, दादाभाऊ अहिरे, उषाबाई शेलार, प्रशांत शेलार, संगिता पाटील, (सर्व येसगाव खुर्द शिवार), सुनंदा देवरे (खाकुर्डी शिवार) व उषाबाई शेलार (येसगाव खुर्द शिवार). या शेतकर्‍यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. – बापू अहिरे, सांख्यिाकी विस्तार अधिकारी.

हेही वाचा:

Back to top button