आता डिजीलॉकरवरही उपलब्ध होणार सीटीईटीचा निकाल | पुढारी

आता डिजीलॉकरवरही उपलब्ध होणार सीटीईटीचा निकाल

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने देशभरातील विविध केंद्रांवर 21 जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटीचे आयोजन केले होते. या परीक्षेचे निकाल डिजीलॉकरवर अपलोड करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. डिजीलॉकरद्वारे उमेदवारांना सीटीईटी 2024 डिजिटल मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’च्या दिशेने हा प्रयत्न असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या परीपत्रकानुसार, परीक्षेशी संबंधित प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि पर्यावरण संरक्षण करणे यासाठी मंडळाने उचललेले एक भक्कम पाऊल आहे. मंडळ मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवते आणि आहे. कागद, झाडे आणि पाणी यासारख्या मौल्यवान संसाधनांची बचत करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.

सीटीईटी 2024 परीक्षेसाठी एकूण 26 लाख, 93 हजार, 526 उमेदवारांनी नोंदणी केली होती. देशभरातील 135 शहरांमधील 3 हजार 418 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पेपर 1 परीक्षेसाठी एकूण 9 लाख, 58 उमेदवारांनी नोंदणी केली होती. आणि पेपर 2 परीक्षेसाठी 17 लाख, 35 हजार, 333 उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर 1 इयत्ता 1 ली ते 5 वी च्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी आयोजित केला जातो, तर पेपर 2 हा इयत्ता 6 वी ते 8 वी च्या शिक्षकांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजित केला जातो.

Back to top button