नाबार्ड तर्फे जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित | पुढारी

नाबार्ड तर्फे जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित

जळगाव- नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठीचा १०९५७.०८ कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५ ) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी अमित कुमार , जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रणव झा, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक आर.एस. लोखंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रबंध निदेशक जितेंद्र देशमुख सर्व बँकांचे प्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते.

‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘नाबार्ड’ द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांना विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात. नाबार्डतर्फे प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग प्रणालीद्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडते.

या आराखड्यात सन २०२४-२५ करिता जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५) १०९५७.०८ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी रुपये ६९१२.५० कोटी, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी रुपये ३२९७०.६३ कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी रुपये १०७३.९६ कोटी प्रस्तावित केले आहेत.

शेती, शेतीपूरक क्षेत्रात प्रामुख्याने पीक कर्जासाठी ३९९०.४४ कोटी, सिंचनासाठी रुपये २६५.७८ कोटी, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी १८३.६६ कोटी, पशुपालन (दुग्ध) रुपये ३१३.०९ कोटी, कुक्कुटपालन रुपये १७१.८३ कोटी शेळी मेंढीपालनासाठी रुपये ३०२.१७ कोटी, गोदाम/शीतगृहासाठी रुपये ११८.६४ कोटी, भूविकास, जमीन सुधारणा रुपये ११५.३५ कोटी, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी रुपये ७८५.५७ कोटी प्रस्तावित केले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज रुपये ४८८.६० कोटी, शैक्षणिक कर्ज रुपये ३८.७५ कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे. महिला बचत गट इतर साठी ४९४.८७ कोटी रकमेचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेत सर्व बँकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी याप्रसंगी केले. जळगाव जिल्ह्यात बँकांनी पात्र पशुपालक व मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्याने वित्त पुरवठा करावा. त्यांना किसान क्रेडिट कार्ड चा लाभ द्यावा, *घर घर केसीसी* या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी च्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा :

Back to top button