नाशिक : ई-चलानातून वाहनचालकांना ठोठावला १२ कोटींचा दंड | पुढारी

नाशिक : ई-चलानातून वाहनचालकांना ठोठावला १२ कोटींचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे याआधी पावती पुस्तक वापरले जात होते. मात्र, काळाच्या ओघात ई-चलानने पावती पुस्तकाची जागा घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही त्याचे सकारात्मक बदल दिसत असून, चालक-पोलिसांचे वादाचे प्रमाण कमी झाले आहे. चालकांनाही दंड भरण्यास पुरेसा कालावधी मिळत असल्याने तेदेखील ई-चलानमार्फत दंड करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारही कमी झाल्याचा दावा केला जात आहे. ई-चलानच्या माध्यमातून नाशिक वाहतूक पोलिसांनी सुमारे बारा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संबधित बातमी :

शहरातील बेशिस्तवाहनचालकांवर ई चलानमार्फत कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. दंड न भरल्यास लोकअदालतीमार्फत नोटीस येऊन संबंधितांना दंड भरण्यास सांगितले जाते. दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिस पावती पुस्तकाऐवजी ई-चलानमार्फत कारवाई करीत आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी चारही पथकांना त्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. टोइंग कारवाई बंद झाल्यानंतर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवरही ई-चलानमार्फतच कारवाई केली जात आहे. तसेच ई-चलान कारवाईमुळे वादविवादाचे प्रसंग कमी झाले असून, नागरिकांकडून पळवाट काढण्यासाठी पोलिसांना विनापावती पैसे देण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आमच्यावर ई-चलान अंतर्गत कारवाई करा, आम्ही प्रलंबित दंड भरू, असे बेशिस्त चालक सांगत असल्याने पोलिसांनाही ते सोयीचे झाले असून, पारदर्शकता वाढत असल्याचा दावा पाेलिसांनी केला आहेे.

ई चलानंतर्गतची कारवाई

युनिट १ – १ कोटी ९२ लाख ६७ हजार ८५० रुपये

युनिट २ – ४ कोटी ५७ लाख ५६ हजार ८५० रुपये

युनिट ३ – ३ कोटी ४२ लाख १ हजार ५५० रुपये

युनिट ४ – २ कोटी २ लाख ४२ हजार ८५० रुपये

एकूण – ११ कोटी ९४ लाख ६९ हजार १०० रुपये

ई-चलानमुळे झालेले बदल

ई-चलानमुळे बेशिस्त चालकांवर कारवाई करणे सोपे झाले असून, वाहनचालक आणि पोलिस अंमलदारांमधील वाद टळल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदवले आहे. त्याचप्रमाणे जवळ रोकड नसतानाही काही दिवसांनी दंड भरता येत असल्याने चालकही वाद न करता ई-चलानचा दंड स्वीकारत आहे. संबंधित वाहनावर किती दंड प्रलंबित आहे आहे, हे एका क्लिकवर समजते व त्यानुसार वाहन जप्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाहन परवाना निलंबनासाठी किंवा न्यायालयीन कारवाईसाठी ई-चलान फायदेशीर ठरत आहे. चालकांसोबत वाद होत नसल्याने, पोलिसांची शारीरिक व मानसिक व्याधी कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button