New Delhi : भाजपला बीएमसी निवडणूक हरण्याची भिती वाटते का? काँग्रेसचा सवाल | पुढारी

New Delhi : भाजपला बीएमसी निवडणूक हरण्याची भिती वाटते का? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकशाही निवडूणकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा काही प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आज (दि.15) नाशिक, कल्याण आणि मुंबई दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सद्वारे पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत.

काय आहेत काँग्रेसचे प्रश्न : 

  • भाजपला बीएमसी निवडणूक हरण्याची का भीती आहे ?
  • मुंबईकरांच्या जीवापेक्षा पंतप्रधानांचे नामांकन महत्त्वाचे आहे का?
  • मुंबईच्या वायू प्रदूषणावर भाजपची काय भूमिका काय आहे?
  • मुंबईच्या लोकल गाड्या जास्त गर्दीच्या आणि असुरक्षित का होत आहेत?

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) 18 महिन्यांहून अधिक काळ प्रशासकांच्या हातात आहे. अनेक वर्षांच्या इतिहासात निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय पहिल्यांदाच एवढा मोठा कालावधी प्रशासकाच्या हातात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणुका घेण्यास महायुती सरकारकडून वारंवार होत असलेला विलंब हा लोकशाहीवर आणि मुंबईतील नागरिकांच्या हक्कांवर एक प्रकारचा हल्लाच आहे. त्यामुळे बीएमसीच्या निवडणुका घ्यायला भाजपला भिती वाटते का? असा खोचक प्रश्न विचारत जयराम रमेश यांनी हल्ला चढवला.

मुंबईच्या लोकलमध्ये दररोज जवळपास ७ लोकांचा मृत्यू होतो. शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्या सुरक्षिततेच्या अभावामुळे आणि कामाच्यावेळी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे कुप्रसिद्ध होत आहेत. तरीही गेल्या एप्रिलमध्ये मुंबईतील दोन मोठे कॉरिडॉर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉर आणि विरार-वसई-पनवेल उपनगरीय रेल्वेमार्ग हे केंद्र सरकारने अचानक रद्द केले. मुंबईच्या जीवनवाहिनीकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष का आहे? पंतप्रधानांच्या या निष्क्रियतेमुळे अजून किती मुंबईकरांचा जीव जाणार आहे? असाही प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. मुंबईच्या प्रदूषणावरूनही काँग्रेसने पंतप्रधानांवर हल्ला चढवला.

यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विविध भागात दौऱ्यावर असताना त्या त्या भागातील समस्यांच्या संबंधित प्रश्न विचारून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा काँग्रेसने काही प्रश्न विचारले आहेत.

Back to top button