Nashik Ganeshotsav : नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांचा “क्यूआर कोड’ | पुढारी

Nashik Ganeshotsav : नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांचा "क्यूआर कोड'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त (Nashik Ganeshotsav) पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करीत परवानगी मिळालेल्या सर्व सार्वजनिक मंडळांजवळ ‘क्यूआर कोड’ (QR code) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्यूआर कोड दिवसातून तीन वेळा पोलिस स्कॅन करतील. त्यामुळे पोलिसांची गस्त राहिल्याने अनुचित प्रकार घडणार नाही व टवाळखोरांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे होणार आहे.

संबधित बातम्या :

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्तालयातील सर्व गणेश मंडळे आणि प्रमुख मंदिरांमध्ये उत्सवकाळात क्यूआर कोड लावण्यात येत आहेत. शहर पोलिसांनी आत्तापर्यंत ५६० सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली आहे. त्यात अंबडमध्ये सर्वाधिक १०२ मंडळांना परवानगी दिली. त्यापाठोपाठ सातपूरमध्ये ६९, पंचवटीत ६५, देवळाली कॅम्पमध्ये ५५, इंदिरानगरात ४३, उपनगर ४२, भद्रकाली ३९, गंगापूर २९, म्हसरूळ २८, आडगाव २४, सरकारवाडा २२ आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ मंडळांना परवानगी दिली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंडळांभोवती क्यूआर कोड लावले जात असून, ते नियमित स्कॅन करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या आहेत. टवाळखोरांवर कारवाईसाठी साध्या वेशातील पोलिसांसह दामिनी पथकातील महिला अंमलदारांचेही पथक राहणार आहे. यासह शहरातील मानाची गणेश मंडळे, मोठी गणेशमूर्ती असलेली मंडळे, आभूषणे असलेली गणेशमूर्ती मंडळे, गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांची कायम गस्त राहणार आहे. (Nashik Ganeshotsav)

शहरातील पोलिस बंदोबस्त

४ पोलिस उपआयुक्त, ७ सहायक पोलिस आयुक्त, ५९ पोलिस निरीक्षक, ६७ सहायक पोलिस निरीक्षक, १२७ पोलिस उपनिरीक्षकांसह सुमारे ३ हजार पोलिस अंमलदार, १ हजार ५० होमगार्डचे जवान, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथक, गुन्हे शोध ३ पथकांसह इतर ४ पथकांचा बंदोबस्त शहरात राहणार आहे.

हेही वाचा :

Back to top button