लासलगावला चाऱ्याअभावी गायींचे हाल, दानशूरांनी चारा दान करण्याचे आवाहन | पुढारी

लासलगावला चाऱ्याअभावी गायींचे हाल, दानशूरांनी चारा दान करण्याचे आवाहन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे 40 हून अधिक गायी व वासरे आहेत. या गायींना सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहावत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे आवाहन गोसेवक आश्रम सचिव दिलीप गुंजाळ, कीर्तनकार संगीता गुंजाळ यांनी केले आहे.

संबधित बातम्या :

शास्त्रीनगर, पिंपळगाव (नजीक) लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ गोशाळा असून कुठलाही शासकीय निधी न घेता, लोकांनी दिलेल्या देणगीतून गायींचे संगोपन केले जाते. सद्यस्थितीत गोशाळेत 40 हून अधिक देशी गायींचे संगोपन दिलीप गुंजाळ करतात. या गायींना चारा उपलब्ध होण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गायींना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. या परिसरात दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कुठेही चारा नसल्याने गायींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ज्यांना विविध कारणांमुळे गायी सांभाळणे शक्य होत नाही, अशा अनेकांनी या आश्रमाला गायी दान केलेल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी गुंजाळ हे समाजातील दानशूर व ग्रामस्थांच्या सहकार्याने निष्ठेने पार पाडत आहेत.

पाऊस नसल्याने सध्या चांगला चारा उपलब्धच होत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गायींच्या चाऱ्यासाठी ज्यांना मदत करणे शक्य आहे, त्यांनी ती करावी व गोरक्षणाच्या या कार्यात हातभार लावावा.

दिलीप गुंजाळ, सचिव, जय जनार्दन अनाथ गोशाळा

हेही वाचा :

Back to top button