CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमधील मराठी बांधवांच्या भेटीला | पुढारी

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमधील मराठी बांधवांच्या भेटीला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी श्रीनगरला होते. यादरम्यान त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली आणि मंडळास गणेशमूर्ती सप्रेम भेट म्हणून दिली. यावेळी त्यांनी “जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ दे”, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी गणरायाला केली. लाल चौकात स्थानिक मराठी सोनार समाजबांधवांमार्फत गेल्या २४ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.  (CM Eknath Shinde )

संबधित बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी श्रीनगरमध्ये आहेत. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘हम सब एक है’ या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीरमधील मराठी कुटुंबीयांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आदी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांनी दुपारी काश्मीरकडे प्रयाण केले. ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमासह महाराष्ट्र – काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात म्हणून काश्मीरमधील ७३ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी श्रीनगर येथे हा कार्यक्रम झाला.

CM Eknath Shinde :  बाळासाहेब ठाकरेंचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध

तरुणांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल.  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध होते, याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन

आज (दि.१८) कारगिल येथे सकाळी सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. अली इराणी तसेच फिजिओथेरपी डॉक्टरांद्वारे कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित वैद्यकीय शिबिराचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छाड येथे सरहद संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या ७२ फुटी तिरंगा झेंड्याचे अनावरण देखील मुख्यमंत्री करणार आहेत.

हेही वाचा

Back to top button