बॉम्ब प्रशिक्षणासाठी निवडले पोल्ट्री फार्म ; तपासात धक्कादायक माहिती समोर | पुढारी

बॉम्ब प्रशिक्षणासाठी निवडले पोल्ट्री फार्म ; तपासात धक्कादायक माहिती समोर

महेंद्र कांबळे

पुणे : पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद युनुस साकी आणि इम्रान खान ऊर्फ युसुफ यांच्याकडील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी पुण्यात दोनदा बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती एनआयएने राजस्थान येथील गुन्ह्यात दोघांना अटक केल्यानंतर समोर आली आहे. त्यातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण मुख्य आरोपी असलेल्या इम्रान खान याच्या पोल्ट्री फार्मवर मिळाल्याचेही उघड झाले आहे. एनआयएने राजस्थान येथील गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासात त्यांनी आयईडी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य राजस्थान येथील चित्तोरगड येथून जप्त करताना इसिसच्या सुफा या दहशतवादी संघटनेचा कट उधळून लावला होता. त्या गुन्ह्यात इम्रान खान आणि मोहम्मद साकी हे फरार होते. पुणे पोलिसांनी इसिसच्या दोन दहशतवाद्यांना पकडल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत असलेल्या तपासात आता धक्कादायक खुलासे होत आहेत.

संबंधित बातम्या : 

एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासात मोहम्मद साकी आणि इम्रान खान हे इसिसची विचारधारा पसरविण्यासाठी महाराष्ट्रात सक्रिय झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या अटकेमुळे इसिसची लिंक उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. साकी आणि इम्रान हे आयईडी बनविण्यामध्ये सक्रिय होते. त्याचबरोबर मास्टर माइंड असलेल्या इम्रान खान याच्याच पोल्ट्री फार्मवर इतर दहशतवाद्यांना आयईडी बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर इम्रान खानची पोल्ट्री एनआयएने मागील महिन्यात जप्त केली आहे. राजस्थान येथून मुंबई आणि नंतर पुण्यात सेटल झाल्यानंतर त्यांनी पुण्यात बॉम्ब म्हणजे आयईडी बनविण्याचे दोन वर्कशॉप घेतल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत तपासात समोर आलेल्या बाबी

  •  दहशतवाद्यांच्या घरातून सापडले ड्रोनचे साहित्य
  •  पुण्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण झाल्याचे समोर
  •  पुण्यातील विविध जंगलांची ड्रोनद्वारे पाहणी
  • जंगलात वास्तव्य करून बॉम्बस्फोटाची चाचणी
  •  इसिसचा प्रसार करणार्‍या उच्चशिक्षितांसह अनेकांना अटक
  •  इसिसच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरलाही अटक
  • आर्थिक रसद पुरविणार्‍यांसह भाडेतत्त्वावर जागा देणारेही अटकेत
  • इसिसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित 5 दहशतवाद्यांवर 3 लाखांचे बक्षीस

Back to top button