‘स्वराज्य’ फुंकणार निवडणुकांचे रणशिंग, संभाजीराजे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर | पुढारी

'स्वराज्य' फुंकणार निवडणुकांचे रणशिंग, संभाजीराजे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे ९ व १० सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, यामध्ये आगामी निवडणुकांचे रणशिंग फुकले जाणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी दिली. या दोन दिवसीय दौऱ्यात संभाजीराजे अनेक सामाजिक घटकांशी संपर्क साधणार आहेत. शनिवारी (दि.९) त्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे सायंकाळी ५ वाजता मुंबई नाका येथे उद्घाटन केले जाणार आहे. ‘स्वराज्यचे आगामी व्हिजन व सुसंस्कृत महाराष्ट्राचे भविष्य’ या विषयावर ते उपस्थितांना संबोधित करतील.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (दि. १०) संभाजीराजे जिल्ह्यातील येवला लासलगाव मतदारसंघाचा नियोजित दौरा करणार असून, या भागातील २५ गावांमध्ये स्वराज्यच्या शाखांचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या दरम्यान ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष असणाऱ्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. येवला पैठणी कला केंद्र येथेदेखील सदिच्छा भेट देणार आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील मैदानात सायंकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वराज्य पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरणार असल्याने हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. सर्व कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र, राज्य कार्यकारिणी, जिल्हा, शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button