नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम, मार्गदर्शनासाठी नगरविकास विभागाला पाठविले स्मरणपत्र | पुढारी

नाशिक : मनपातील डॉक्टर भरतीचा पेच कायम, मार्गदर्शनासाठी नगरविकास विभागाला पाठविले स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने मान्यता दिलेल्या ६७१ पदांपैकी ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील ५८७ पदांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबवली जात असली तरी, ‘अ’ संवर्गातील ८४ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया टीसीएसमार्फत राबवावी की, एमपीएससीमार्फत यासंदर्भातील पेच कायम आहे. याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रतिसाद लाभू शकलेला नाही. त्यामुळे शासनाला स्मरणपत्र पाठविण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावली आहे.

कोरोना काळात राज्यशासनाने नाशिक महापालिकेतील तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या ६७१ नवीन पदांच्या भरतीला मान्यता दिली होती. या पदांच्या भरतीसाठी महापालिकेने टीसीएस कंपनीमार्फत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. शासन निर्णयानुसार टीसीएसमार्फत ब ते ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचीच भरती करण्याची मुभा असल्याने ब ते ड संवर्गातील ५८७ पदांचीच भरती टीसीएसमार्फत शक्य आहे. वैद्यकीय विभागातील डॉक्टर या पदासह अन्य काही संवर्गातील एकूण ८४ पदे ही ‘अ’ संवर्गातील आहे. या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविली जात असते. त्यामुळे या पदांची भरती टीसीएसमार्फत राबवावी की एमपीएससीमार्फत यासंदर्भातील मार्गदर्शन महापालिकेने शासनाकडून मागविले आहे. त्यासाठी ३० जून रोजी नगरविकास विभागाला पत्रही पाठविले आहे; परंतु, महापालिकेच्या या पत्राला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद लाभू शकलेला नाही. त्यामुळे नगरविकास विभागाला स्मरणपत्र पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे.

राज्यात ‘अ’ संवर्गातील पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. त्यामुळे ही पदे टीसीएसकडून भरावी की, एमपीएससीमार्फत याबाबत महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. शासनाकडून प्रतिसाद न लाभल्याने स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.

– लक्ष्मीकांत साताळकर, उपआयुक्त (प्रशासन), मनपा

हेही वाचा :

Back to top button