नाशिकच्या रस्त्यांवर ‘व्हाईट टॉपिंग’, तीन वर्ष रस्ते खड्डेमुक्त | पुढारी

नाशिकच्या रस्त्यांवर 'व्हाईट टॉपिंग', तीन वर्ष रस्ते खड्डेमुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेला दुषणं सहन करावी लागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर शहरातील डांबरी रस्त्यांवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात काँक्रिटीकरणाचा थर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर व्हॉईट टॉपिंग केले जाणार आहे. यामुळे किमान तीन वर्षे तरी रस्त्यांची खड्ड्यांपासून मुक्तता होणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरणावर तब्बल साडे बाराशे कोटी रुपये खर्च केले आहेत. दरवर्षी सरासरी अडीचशे कोटी रुपये रस्ते डांबरीकरणावर खर्च केले जातात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात हे रस्ते खड्डेमय बनतात. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरूस्तीवर पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. यातून ठेकेदारांचेच चांगभले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून कर रूपाने जमा होणाऱ्या पैशांची मात्र उधळपट्टी होते. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत काँक्रिटचे रस्ते अधिक काळ टिकतात. ऊन-पावसाचा काँक्रिटच्या रस्त्यावर कुठलाही परिणाम होत नाही.

यंदाच्या पावसाळ्यातही शहरातील डांबरी रस्त्यांची दैना झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेतील आढावा बैठकीत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी नाराजी व्यक्त करताना प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी भविष्यात शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला प्राधान्य दिले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र रस्ते काँक्रिटीकरणावर होणारा खर्च हा डांबरीकरणाच्या खर्चापेक्षा दुपटीहून अधिक असल्याने काँक्रिटीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचनाही करंजकर यांनी दिल्या होत्या. आता, रस्त्यांचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यापूर्वी प्रमुख मार्गांवरील डांबरी रस्त्यांवरील खड्डे किमान पुढील तीन वर्ष तरी पडणार नाही, यासाठी हैद्राबादच्या धर्तीवर व्हाईट टॅपिंगचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सुमारे १२० किमीच्या रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात व्हाईट टॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे व्हाईट टॅपिंग?

खड्ड्यांनी चाळण झालेल्या डांबरी रस्त्यांचे ग्रीलिंग अर्थात हलके खोदकाम करून त्यावर काँक्रिटचा थर देऊन संपूर्ण रस्ता तयार केला जातो. या तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या रस्त्यांची उंची वाढत नाही. परिणामी रस्त्यांलगतच्या सखल भागात पाणी साचण्याची समस्या राहत नाही. डांबरीकरणाच्या तुलनेत हे रस्ते टिकाऊ असतात. डांबरीकरणासाठी लागणारी वाळू, खडी यात लागत नाही. त्याचीही बचत होते. व्हाईट टॉपिंग पध्दतीचे काँक्रिटचे रस्ते तापमान कमी राखण्यास मदत करतात

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी शहरातील रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग तत्रज्ञानाच्या आधारे काँक्रिटीकरण केले जाईल. पहिल्या टप्प्यात १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर व्हाईट टॉपिंग केले जाईल. याद्वारे मनपाच्या पैशांची बचत होईल.

-शिवकुमार वंजारी, शहर अभियंता.

हेही वाचा :

Back to top button