वाशिम: पातूरमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात; ६ ठार, ४ जण जखमी | पुढारी

वाशिम: पातूरमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात; ६ ठार, ४ जण जखमी

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवर भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण ठार झाले. तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातातील मृतांमध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक (वय २८), अस्मिता अजिंक्य आमले (वय ९ महिने,) शिवानी अजिंक्य आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५,  रा. पास्टुल), शंकर ठाकरे (रा. पास्टुल) व सुमेध इंगळे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख (वय ४१) तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे (वय ३ महिने ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा मृत्यू  झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरासमोर दोन वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील सरनाईक कुटुंब हे वाशिमवरून अकोलाकडे जात  होते.

दरम्यान, चारपदरी असलेल्या अकोला- वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळेच हे दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात झाला.

हेही वाचा 

Back to top button