नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा | पुढारी

नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पॅनकार्ड अपडेट करण्यास मदतीच्या बहाण्याने एका भामट्याने बँक खातेधारकास बॅंकेचे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने खातेधारकाच्या मोबाइलचा ताबा घेत परस्पर कर्ज काढून सुमारे चार लाखांना गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश रमेशचंद्र सोनवणे (४१, रा. गोविंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्याने ५ ऑगस्टला सायंकाळी गंडा घातला. सोनवणे यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्याने संपर्क साधला. यासाठी भामट्याने त्यांना ‘ॲक्सिस.एपीके’ हे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर संशयितांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेत सोनवणे यांच्या क्रेडिट कार्डवर चार लाख १८ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढले. त्यापैकी चार लाख १५ हजार ९८५ रुपये भामट्याने इतर बँक खात्यात वर्ग करून सोनवणे यांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनवणे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सोनवणे यांना फोन करणारा दिलीप रंजन, पॅनकार्ड अपडेटसाठी लिंक पाठवणारा व्हॉट्सअप क्रमांक धारकाविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button