नाशिक : येवल्यातील 'त्या' प्रकरणात प्रांताधिकारी निर्दोष
येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले महसूल खात्यातील ते प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. जिल्ह्यातील येवला उपविभागाचे तात्कालीन प्रांताधिकारी सोपान कासार यांची महिला तलाठ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपातून येवला वरिष्ठ स्तर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या या आरोपाच्या प्रकरणा मुळे संपूर्ण राज्यसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
सोपान कासार हे 2021 मध्ये येवला महसूल उप विभागात प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी तालुक्यातील सायगाव येथील महिला तलाठी यांनी कासार यांनी विनयभंग केल्याची तक्रार येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 16 ऑगस्ट 2021 मध्ये दाखल केली होती. या तक्रारीवरून प्रांताधिकारी कासार यांचे विरुद्ध भा दं वि 354 अ व 506 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपण बदलीस पात्र नसतानाही प्रांताधिकारी कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली होती. ही बदली रद्द करण्याच्या बहाण्याने प्रांतधिकारी कासार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीमध्ये संबंधित तलाठी महिलेने केला होता.
येवला वरिष्ठ स्तर न्यायालयात मध्ये या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एम.एस लिगाडे यांचे समोर झाले. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे यांनी केला.
प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. शंतनु कांदळकर व ऍड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडले. दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी माननीय न्यायालयाने या प्रकरणातील तथ्य तपासून प्रांताधिकारी सोपान कासार यांची निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचा :