कोल्हापूर : ११२ हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : ११२ हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यावर गुन्हा दाखल

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : आपत्कालीन घटनेत पोलिसांची तात्काळ मदत मिळावी यासाठी सुरू असलेल्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून त्रास देणाऱ्या मद्यपीवर हेल्पलाईन सुविधेचा अवमान केल्याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश अशोक सोंळाकुरकर (वय ३४) रा. रेखानगर, गारगोटी असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अशोक सोंळाकुरकर याने शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता ११२ या हेल्पलाईनवर कॉल केल्याने पोलिसांनी मदतीसाठी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी हेल्पलाईनवर कॉल करणारा अशोक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता आरडाओरड करून आपण कॉल केला नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अशोक याने यापुर्वीही या हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना त्रास दिला होता. पोलीस कॉन्स्टेबल विनायक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक याच्यावर हेल्पलाइन सुविधेचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मदतीसाठी प्रायोगिक तत्वावर ८ सप्टेंबर २०२१ ला ११२ हा क्रमांक सुरु केला. या सुविधेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात ११२ नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ७ मिनिटांमध्ये पोलिसानांची मदत मिळते. मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ११२ ही हेल्पलाईन आहे. तक्रारदार व्यक्तीचा तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असते.

हेही वाचा : 

Back to top button