भुदरगड तालुक्यात लम्पी रोगाचा धुमाकूळ!

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यात लम्पी रोगाने धुमाकूळ घातला असून, सहा महिन्यांत तालुक्यातील 350 हून अधिक जनावरे दगावली आहेत. सध्या तालुक्यातील तब्बल 30 ते 35 गावांतील जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हबकला आहे. गोकुळ दूध संघाच्या अधिकार्यांनी याबाबत उपाययोजना न केल्याचा आरोप दूध उत्पादकांमधून केला जात आहे.
गाय, बैल अशा जनावरांच्या कातडीवर फोड येत आहेत. प्रसंगी कातडी सोलून निघते. उपचार करूनही फारसा फरक पडत नाही. या आजारात गायवर्गीय जनावरांचा मृत्यू होतो. डिसेंबर 2022 मध्ये आलेल्या या आजारात सुमारे 200 जनावरे दगावली होती. काही दिवस या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला होता; मात्र तो पूर्णपणे गेला नव्हता. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.
सुमारे 470 जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या ठिकाणी सुरू असलेले जनावरांचे बाजार व व्यापार्यांकडून होणारी विक्री, यामुळे लम्पी रोग जास्तच फैलावल्याची चर्चा आहे. तालुक्यात सुमारे साडेअकरा हजारांहून अधिक गायवर्गीय जनावरे आहेत. मात्र, जनावरांना पशुवैद्यकीय सेवा देणारी शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. तालुक्यातील अनेक दवाखान्यांत पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्यामुळे दवाखाने ओस पडले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेली कित्येक वर्षे दूध संघाकडे आम्ही दूध घालतो. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघाच्या अधिकार्यांनी लक्ष द्यावे, असेे बसरेवाडी येथील दूध उत्पादक अश्विनी मोरे यांनी सांगितले.