वाघ संवर्धनासाठी साजरा करूया जागतिक व्याघ्र दिन, अशी आहे यंदाची थीम | पुढारी

वाघ संवर्धनासाठी साजरा करूया जागतिक व्याघ्र दिन, अशी आहे यंदाची थीम

दीपिका वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घायाळ करणारी नजर, रूबाबदार चेहरा, चालण्याची ती एेट, मिशांचा मिजास आणि थरकाप उडवणारा डरकाळीचा आवाज.. अशा अजस्त्र प्राण्याचा आजचा दिवस म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन. २९ जुलै हा दिन जागतिक व्याघ्र दिन म्हणून जगभर दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार साजरा केला जातो.

रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिन जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. वाघ संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांची कमी होणारी संख्या, जंगल कमी झाल्यामुळे मानवी वस्तीत वाघांची होणारी घुसखोरी यामुळे वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि वाघ संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक ध्येय असते. शिकार करून वाघनख चोरणे, बेकायदा व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमी केल्यास जंगलांची बचत होईल, ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवास वाढेल म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

यंदाची आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची ‘वाघांचे भविष्य : पर्यावरणासाठी कार्य’ थीम आहे. अन्नसाखळीमध्ये वाघ महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शिकारी असतात जे इतर प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रित करतात. तसेच वनस्पती बियाणे विखुरण्यास मदत करतात. जेव्हा वाघांची संख्या कमी होते तेव्हा त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव

विदर्भ ही जगाची व्याघ्र राजधानी झाली आहे. मात्र, आता वाघांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध जंगलातील क्षेत्र वाघांना पुरत नाही. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वाघांचे स्थलांतर इतरत्र करण्याचा विचार सुरू आहे. त्यात सह्याद्री पर्वतराजी आणि पश्चिम घाट परिसरात वाघांचे स्थलांतर करण्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल तसेच वाघांच्या परिभ्रमण मार्गांसाठी (टायगर कॉरिडॉर) नवीन वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव असल्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

असा होतो साजरा व्याघ्र दिन

व्याघ्र दिनानिमित्ताने अधिकाधिक लोकांना वाघांची माहिती देऊन त्यांच्या संवर्धनाबाबत प्रबोधन करण्याचे काम केले जाते. या दिवशी वाघांच्या संवर्धनासंदर्भात चर्चासत्र आयोजित केली जातात. तसेच वाघांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन आणि देणगी दिली जाते.

वर्षनिहाय देशातील वाघांची संख्या

२००६ : १४११

२०१० : १७०६

२०१४ : २२२६

२०१८ : २९६७

२०२२ : ३०८०

हेही वाचा :

Back to top button