रोममध्ये सापडले नीरोच्या थिएटरचे अवशेष | पुढारी

रोममध्ये सापडले नीरोच्या थिएटरचे अवशेष

रोम : येथील पुरातत्त्व संशोधकांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकातील सम्राट नीरोच्या थिएटरचा म्हणजेच सभागृहाचा शोध लावला आहे. प्राचीन रोमन ग्रंथांमध्ये या थिएटरचे वर्णन होते; पण ते नेमके कुठे होते हे समजू शकले नव्हते. आता रोममधील पॅलेझ्झो डेल्ला रोव्हर येथे एका हॉटेलच्या इमारतीसाठी केलेल्या उत्खननावेळी हे अवशेष सापडले. याठिकाणी प्राचीन काळातील अनेक भांडी व कलाकृतीही सापडल्या. तेथील संगमरवरी खांब व भिंतीवरील सोन्याच्या मुलाम्यावरून हे नीरोच्या थिएटरचेच ठिकाण असल्याचे संशोधकांना वाटते. तसे वर्णन प्राचीन साहित्यात आहे.

या थिएटरला नीरो क्लौडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस याचे नाव आहे. या रोमन सम्राटाने इसवी सन 54 ते इसवी सन 68 पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत राज्य केले. ‘रोम जळत होते आणि नीरो फीडल वाजवत होता’ ही म्हण याच राजावरून आलेली आहे. व्हॅटिकन सिटीच्या पूर्वेकडे अपघातानेच त्याच्या थिएटरचा शोध लागला असून हा एक अपवादात्मक आणि अत्यंत महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

याच ठिकाणी नीरो काव्य, गीते गायनाचा सराव करीत असे तसेच या गीतांवर आधारित संगीत कार्यक्रमही सादर करीत असे. इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध अशा राजांमध्ये नीरोचा समावेश होतो. रोममध्ये मोठी आग लागली असताना हा राजा आपल्याच छंदात मग्न होता. त्याने त्याच्या स्वतःच्या आईची तसेच दोन पत्नींचीही हत्या केली होती, असे म्हटले जाते.

संबंधित बातम्या

रोमन साम्राज्याचा खजिना तो स्वतःच्या भोगविलासात उधळत असे. मात्र, त्याला कला व संगीताविषयी आवड होती. त्याच्या थिएटरमध्ये तो कलेचे सार्वजनिक कार्यक्रम सादर करीत असे. त्याला विशेषतः वाद्यवादनाची आवड होती. त्या काळात कुलीन वर्गातील लोक असे कार्यक्रम सादर करण्यात समाविष्ट होत नव्हते हे विशेष! आता त्याच्या याच थिएटरचे अवशेष सापडले आहेत. तिथे काही नाणी, भांडी, कंगवे, वाद्यांचे अवशेषही मिळाले. पॅलेझ्झो डेल्ला रोव्हर या मध्ययुगीन राजवाड्याचे सध्या नव्या लक्झरी हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. तेथील बागेत केलेल्या उत्खननावेळी या थिएटरचे अवशेष सापडले.

Back to top button