सांगली : वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण काढणार; अधिकारी – ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय | पुढारी

सांगली : वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण काढणार; अधिकारी - ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : विजापूर – गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वासुंबे फाटा (ता.तासगाव) येथील ब्लॅक स्पॉट ठरविण्यात आलेले धोकादायक वळण लवकरच काढण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रशासकीय कारवाई सुरु करण्याची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी व तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी दिली. तहसिलदार कार्यालयामध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावरील वासुंबे हद्दीतील वळणावरील अपघातांची मालिका महामार्ग सुरु झाल्यापासून थांबत नाही. धोकादायक वळणावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी येथे दोन मोठे गंभीर अपघात झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर तासगाव तहसिलदार कार्यालयात तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरचे उपाभियंता जे. सी. बागवान, शाखा अभियंता एस. बी. शेळके, तासगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, बाळासाहेब एडके, वासुंबेचे सरपंच जयंत पाटील, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने, अक्षय पाटील, उपसरपंच उमेश एडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत हे धोकादायक वळण काढून टाकण्यासाठी आराखडा मंजुरीसाठी देण्यात आला. लवकर त्याला मान्यता मिळेल. येत्या दोन महिन्यात काम मार्गी लागेल, अशी ग्वाही महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण रुग्णालयाची जागा यामध्ये येत असल्याने विभागाची परवानगी घेणे, यासारखी प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ग्रामस्थांनी अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. बैठकीसाठी विकास मस्के, सतीश एडके, शितल हक्के संतोष एडके, बाळासाहेब शेळके डॉ. साळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button