सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज! | पुढारी

सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज!

वॉशिंग्टन : बटाट्याचे अनेक पदार्थ जगभरातील लोकांच्या आहारात समाविष्ट आहेत. ब्रिटिश लोकांच्या तर मांसाहारी जेवणातही उकडलेला बटाटा असतो! बटाट्याचे उभे काप तळून त्याला मीठ-मसाला लावून चटपटीत केलेला ‘फ्रेंच फ्राईज’ हा पदार्थही जगभर आवडीने खाल्ला जातो. अनेक लोक घरीही हा पदार्थ तयार करीत असतात. मात्र, अमेरिकेतील एका हॉटेलात या पदार्थाची जी किंमत आहे ती थक्क करणारीच आहे. हे जगातील सर्वात महागडे फे्ंरच फ्राईज आहेत.

न्यूयॉर्कच्या ‘सेरेंडीप्टी 3’ नावाच्या रेस्टॉरंटमधील दोन शेफनी ही फ्रेंच फ्राईजची खास डिश बनवली आहे. तिला ‘क्रीम डी ला क्रम पोम फ्रि टीज’ असे नाव देण्यात आले आहे. शेफ जो आणि शेफ फ्रेड्रिक यांनी ही डिश तयार केली. जगभरातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज तयार करण्यासाठी त्यांनी चिपरबेक बटाटा, लेब्लांक फ्रेंच शॅम्पेन, डोम परिगनन शॅम्पेन, व्हिनेगार, ग्वेरंड टफल मीठ, टफल ऑईल, इटालियन चीज, टफल बटर, ऑर्गेनिक ए-2 फेड क्रीम आणि खाण्यायोग्य सोन्याचा वर्ख यांचा वापर केला आहे. या फ्रेंच फ्राईजची किंमत होती 200 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 14 हजार 992 रुपये! हे जगातील सर्वात महागडे फे्ंरच फ्राईज ठरले आणि त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली.

Back to top button