थायलंडची विद्यार्थिनी नाशिकमध्ये गिरविणार धडे, पेराडा पुमखाचोरनचा ‘केटीएचएम’मध्ये प्रवेश | पुढारी

थायलंडची विद्यार्थिनी नाशिकमध्ये गिरविणार धडे, पेराडा पुमखाचोरनचा 'केटीएचएम'मध्ये प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे थायलंड देशातील विद्यार्थिनी शैक्षणिक धडे गिरविणार आहे. एएफएस इंटरकल्चरल प्रोग्रॅम या कार्यक्रमांतर्गत मिस पेराडा पुमखाचोरनचे नाशिकमध्ये आगमन झाले. तिने इयत्ता अकरावीसाठी मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ती वर्षभर योगिता आणि शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहे.

एएफएस आंतरसांस्कृतिक कार्यक्रम ही एक आंतरराष्ट्रीय, स्वयंसेवी, गैर-सरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती लोकांना अधिक न्याय्य आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि समज विकसित करण्यात मदत करण्यासाठी आंतरसांस्कृतिक शिक्षणाच्या संधी देते. परदेशातील अभ्यास व इतर कार्यक्रम तरुण विद्यार्थ्यांना आणि लोकांना जागतिक आणि बहुसांस्कृतिक वातावरणात स्वतःला लायक करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून प्रभावीपणे तयार करतात.

एएफएस आंतरसांस्कृतिक कार्यक्रमाला ७० हून अधिक वर्षांचा अनुभव असून, अग्रगण्य आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. दौलत जाधव यांनी पुमखाचोरन हिचे स्वागत केले. यावेळी डीलिजंट बॅचचे समन्वयक डॉ. कैलास शिंदे, प्रा. जी. एस. खुळे, एएफएसचे अध्यक्ष प्रमोद कांगुणे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, समन्वयक जीवन शिंदे, स्वयंसेवक शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button