Mental Health : मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळाल? ‘या’ टीप्‍स करतील मदत | पुढारी

Mental Health : मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळाल? 'या' टीप्‍स करतील मदत

डॉ. संतोष काळे

मानसिक आरोग्याविषयी ( Mental Health )  लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आढळतात. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे ही गोष्ट सामाजिक प्रतिष्ठेच्या आड येणारी किंवा त्यात बाधा आणणारी बाब समजली जाते. पण आजच्या बदलत्या काळात खरेतर या गैरसमजुती मागे टाकणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना नि भावनांना समर्थपणे सहजतेने सामोरं जाण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभलं असं म्हणता येईल. परंतु आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच समस्यांना समाधानकारक उत्तरं मिळतात किंवा मार्ग सापडतात, असे होत नाही. सर्वच व्यक्तीमध्ये येणाऱ्या प्रसंगांना समतोलाने, धीराने सामोरे जाण्याची कुवत असतेच असं नाही.

Mental Health : मानसिक स्वास्थ्य ढळल्‍याचे वर्तणुकीतून दिसते

एखाद्या तज्ज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येऊ शकतो. मात्र यासंदर्भात आपल्याकडे फारशी जागरूकता नाही. मनाचे स्वास्थ्य ढळले तर त्याची अनेक चिन्हे वागण्या-बोलण्यातून, वर्तणुकीतून दिसायला लागतात. मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृत्तीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कटकारस्थाने रचतात असे वाटत रहाते. कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटत राहते. त्या एकच एक गोष्ट सतत करीत राहतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, एंक्झायटी डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर अशा वेगवेगळ्या प्रकारात मानसिक आजारांचे वर्गीकरण केले गेले आहे.

संबंधित बातम्या

स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो. डिप्रेशन हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते तसेच ते बाह्य वातावरणामुळेही येऊ शकते. घरातील वातावरणही त्यास कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडी बनते. फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटत राहते. ही भीती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची अशी कशाचीही असू शकते. एका मर्यादेपलीकडे ही अनामिक भीती गेली की, त्याला फोबिया म्हणतात. असे एक ना अनेक प्रकारचे त्रास मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे चिन्ह ठरतात.

Mental Health : कुटुंबासह मित्र आणि सहकार्‍यांची भूमिका महत्त्वाची

रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांनी तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार समुपदेशनाचा लाभ घेणे. उपचारांचा कालावधी रुग्णाच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असतो.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा आहे. जीवन अतिरेकी धावपळीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर जर घेतले पाहिजे. पुढच्या पिढ्यांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ असावे असे वाटत असेल तर आपल्या मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी पालकांनी जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. घरी असताना एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात.

Mental Health :’या’ टीप्‍स करतील मदत

 काही ना काही छंद असला पाहिजे

ताणतणाव दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे त्यासाठी आपली आवड काय आहे, हे व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही ना काही छंद असलेच पाहिजेत, जेणेकरून आपले मानसिक आरोग्य जपायला मदत होईल. शिवाय प्रत्येक व्यक्तीने आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योग आणि ध्यानधारणेचा मार्ग सातत्याने उपयोगात आणला पाहिजे.

दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी

प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला दोष देतो. पण संकटाला संधी समजल तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले.

मानसिक समस्यांवर योग्य वेळी योग्य उपचार करणेही निकडीचे

आज विशेषतः मानसिक आजारांच्या समस्यांकडे असंवेदनशील दृष्टीने पाहण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत आहे. अनेकदा समस्या कंठाशी येईपर्यंत घरातून फारशी हालचाल होताना दिसत नाहीत. शारीरिक आजारावर तत्काळ औषधोपचार होणे आवश्यक असतं हे आपण जाणतो. तसंच आता मानसिक समस्यांवर योग्य वेळी योग्य उपचार करणेही निकडीचे असते हे आपण समजून घेतले पाहिजे.

हेही वाचा : 

Back to top button