कामशेत : ‘ढाकबहिरी’मध्ये हरवलेल्यांचा घेतला शोध | पुढारी

कामशेत : ‘ढाकबहिरी’मध्ये हरवलेल्यांचा घेतला शोध

कामशेत(पुणे) : मावळमधील जांभवली कोंडेश्वर, ढाकबहिरी परिसरात शनिवार (दि.15) रोजी ट्रेकिंगकरिता गेलेले पर्यटक जंगलामध्ये रस्ता भटकले. या चुकलेल्या पर्यटकांनी 112 वर कॉल करून कामशेत पोलिसांना संपर्क केला. त्यामुळे या तरुणांना वाचवण्यात कामशेत पोलिसांना व पोलिस मित्रांना यश आले आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद गोविंद शिंदे (26) रा. भोसरी पुणे, यशवंत श्रीपत साने (27) रा. चिखली पुणे, रोहण पाटील (28) रा. आकुर्डी पुणे, रोहित सोनवणे (26) रा. देहू पुणे हे चौघेजण डोंगरदर्‍या घनदाट जंगलामध्ये हरवल्याबाबत डायल 112 रात्री नऊच्या दरम्यान कॉल आला. त्या कॉलवरून कामशेत पोलिस स्टेशचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनप्रमाणे डोंगरदर्‍यामध्ये रात्री रस्ता हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

पोलिस स्टाफ, जांभवली गावातील स्वयंसेवक पोलिस मित्र अनंता कदम, ज्ञानेश्वर कदम, शंकर कदम, अमोल कदम, सागर कदम, बाळू पवार सोबत इतर पोलिस मित्र यांना मदतीसाठी पाठवले. मोबाईल फोनवरून मिसिंग मुलांच्या संपर्कात राहून त्यांना धोका न पत्करता आहे, त्या ठिकाणी थांबण्यास सांगून वेळोवेळी सूचना व धीर देऊन त्यांचा शोध घेतला.

तरुणांनी मानले पोलिसांचे आभार

रस्ता चुकलेल्या युवकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे रात्री अकराच्या सुमारास जंगलातून बाहेर आणण्यात आले. या युवकांनी ते ट्रेकिंग करीत असताना डोंगर दर्‍यातील दाट धुक्यामुळे व नंतर अंधार झाल्याने आपण रस्ता चुकल्याचे सांगितले. संकटाच्या वेळी मदत करून जीव वाचवल्याबद्दल पोलिसांचे व मदत करणार्‍या स्थानिकांचे या युवकांनी आभार मानले आहेत.

‘धोकादायक ठिकाणी जाणे टाळा’

वर्षा पर्यटनासाठी येणार्‍या लोकांना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे व पोलिसांचे सूचना पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वर्षा सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांचे गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियमन व संकटकालीन परिस्थितीत स्वयंसेवकाची मदत व्हावी, यासाठी लोणावळा पोलिस, स्वयंसेवक दल याचे सदस्य बनण्यासाठी नोंदणी करण्याचे स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे.

हेही वाचा 

पिंपरी : अतिरिक्त आयुक्त जितेंद्र खोराटे यांच्या पदाचा वाद कायम

न्यूझीलंड : फुटबॉल वर्ल्डकपच्या उद्घाटनापूर्वी गोळीबार, 3 जण ठार

पिंपरी : व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णसंख्येत वाढ

Back to top button