नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी | पुढारी

नाशिक : टायर फुटून कार धडकल्याने दुचाकीस्वार ठार, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथील नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीसमोर 15 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच याच ठिकाणी सोमवारी (दि. १०) दुपारी 3.30 च्या सुमारास टायर फुटून कार दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून पिंपळगाव बाहुलाकडून त्र्यंबकच्या दिशेने कमलाकर पांडुरंग पारधी (३०), ललिता कमलाकर पारधी (२७), विद्या कमलाकर पारधी (७), तनिष्क कमलाकर पारधी (४) हे कुटुंब जात होते. त्याचवेळी त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच १५, ईएक्स ६४३१) चा टायर फुटला. ही कार विरुद्ध दिशेला उडून हॉटेल संस्कृतीसमोर येणाऱ्या पारधी कुटुंबाच्या दुचाकीस धडकली. यात दुचाकीचालक कमलाकर पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला. कमलाकर यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ललिता तसेच दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत.

तातडीने उपाययोजना हवी

अपघाताच्या ठिकाणी २५ जूनलादेखील कारचे टायर फुटून कारच्या धडकेने दोन युवकांचा मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर अपघातांची मालिका सुरूच असून, अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

Back to top button