उत्तरेतील उत्पात | पुढारी

उत्तरेतील उत्पात

हवामान खात्याकडून दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करताना तो सरासरीइतका होईल की, त्याचे प्रमाण कमी-जास्त होईल, हे सांगितले जाते. परंतु, तो अंदाज पावसाळ्यातील एकूण पावसाचा असतो. त्यामुळे टक्केवारीचा अंदाज बरोबर ठरला, तरी अनेकदा याच काळात दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या संकटांना सामोरे जावे लागते. देशाच्या उत्तरेकडे पावसाने जो हाहाकार माजवला आहे, त्यातून हेच दिसून येते. देशामध्ये उशिराने आगमन झालेल्या पावसाने अवघ्या आठ दिवसांत तुटीची भरपाई केली आहे. भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात एकत्रितरीत्या 243.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या दोन टक्के जास्त आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडाभरातच पावसाने तूट भरून काढली असली, तरी ही तूट भरून काढताना जो उत्पात माजवला आहे, तो न भूतो न भविष्यती आहे. राजधानी दिल्लीला तर बेहाल करून टाकताना रविवारी एका दिवसामध्ये 41 वर्षांचा विक्रम मोडीत काढून दिल्लीवासीयांना जबर तडाखा दिला.

हिवाळ्यात प्रदूषणामुळे दिल्लीची चाके थांबतात, तशीच पावसाच्या हाहाकाराने राजधानीची गती संथ केली. चोवीस तासांत 153 मिलिमीटर पाऊस हा राजधानीतील 1982 नंतरचा विक्रम आहे. मोठा पाऊस होतो तेव्हा धरणे, जलसाठेही ओसंडून वाहतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागते, ते न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हरियाणातील हाथनीकुंड जलसाठ्यातून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी, यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याचा आणखी एक धोका समोर उभा ठाकला. उत्तर भारतात बराचसा पहाडी प्रदेश असल्यामुळे अतिवृष्टीचे अत्यंत रौद्र रूप पाहावयास मिळते आणि सध्या तेच पाहावयास मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. उत्तर भारतातील या संकटाने अनेकांचे बळी घेतल्यामुळे संकटाची तीव—ता वाढली आहे.

निसर्गाच्या प्रकोपापुढे अनेकदा मानवी ताकद अपुरी पडत असते. विशेषतः, पहाडी प्रदेशात मानवी प्रयत्नांवर प्रचंड मर्यादा येतात. पाऊस कोसळत असतो आणि नद्या उफाणलेल्या असतात तेव्हा त्यामुळे होणारा विध्वंस फक्त डोळ्यांनी पाहावा लागतो आणि त्याचा जोर कमी झाल्यानंतरच मदतकार्य करता येते. पावसामुळे ठिकठिकाणी घरे पाण्याखाली गेली असून, अनेक ठिकाणचे रस्ते, पूलही वाहून गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा अशा सगळीकडे ही स्थिती असून, आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. रेल्वे सेवेवरही परिणाम झाला असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या; तर काही गाड्यांचे मार्ग बदण्यात आले. तीच गत रस्तेमार्गाची आहे. रेल्वे ही जीवनवाहिनी मानली जाते, रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे लाखो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. संबंधित खात्याचे त्यामुळे होणारे नुकसान पुन्हा वेगळे असते.

हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या चौदा मोठ्या घटना घडल्या असून, तेरा ठिकाणी अचानक पूर आला. सातशे रस्ते बंद करावे लागले. उत्तराखंडमध्येही भूस्खलनामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली. राजधानी दिल्ली तर पूर्णत: कोलमडली आहे. देशात या प्रत्येक हंगामात महापुराचे संकट कुठे ना कुठे येतच असते. मधल्या काळात ईशान्य भारतामध्ये पावसाने हाहाकार माजवला. आता उत्तर भारतात त्याचे भीषण रूप दिसत आहे. बिहारच्या कोसी नदीचा कोप दरवर्षी बघायला मिळत असतो आणि महाराष्ट्रातही अद्याप नसले, तरी महापुराचे संकट दरवर्षी बघायला मिळते. ‘नेमेचि येतो पावसाळा’ असे म्हणता म्हणता ‘नेमेचि येतो महापूर’ असे म्हणण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. ठरावीक काळात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस एवढेच याचे कारण समजणे म्हणजे, आपण आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासारखे होईल. या संकटाच्या मुळापर्यंत जाताना अनेक कारणे समोर येतात, त्यातील पहिले कारण म्हणजे, हवामान बदल. हवामान बदलाच्या संकटाने संपूर्ण जगाला धोका निर्माण केला.

हिमालयाच्या शिखरावरील बर्फ वितळण्यापासून ते दुष्काळ, वादळे, अतिवृष्टी, महापूर या संकटांमागे मुख्य कारण हवामान बदलाचेच असते. नैसर्गिक बाबींशी माणसाने केलेल्या छेडछाडीमुळे हे संकट निर्माण झाल्याचे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे, त्यासंदर्भात जागतिक पातळीवर सातत्याने चर्चा सुरू असते. परंतु, त्याची दखल त्या गांभीर्याने घेतली जात नाही. संकटांची तीव—ता वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे, माणसाची वाढलेली हाव आणि त्यासाठी निसर्गावर होणारे अतिक्रमण. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात केली जाणारी बांधकामे, समुद्र मागे ढकलून केला जाणारा विकास, मोकळ्या जमिनीचे केले जाणारे सिमेंटीकरण आणि प्लास्टिकचा अमर्याद वापर अशा अनेक कारणांमुळे नेहमीच्या संकटांची तीव—ता अधिक वाढताना दिसते. उत्तर भारत हे पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. परंतु, पर्यटकांनी तिकडे प्लास्टिकचे नवे डोंगर निर्माण केले आहेत.

पर्यटकांच्या सुविधांसाठी अमर्याद बांधकामे केली जाताहेत, त्याचा फटका आपसुकच सगळ्यांना बसताना दिसतो. सरकारी निर्बंधांनी त्याला आळा घालणे कठीण असून, त्यासाठी प्रबोधनाचीच गरज आहे, तेही केले जाते. परंतु, त्याचा परिणाम होत नाही. लोक बेजबाबदारपणे वागतात आणि मग अशी संकटे आली की, सरकारकडे बोट दाखवून तो लपवण्याचा प्रयत्न करतात. एकाचवेळी अत्यंत कमी कालावधीत अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढले आहेत, तो याचाच परिणाम. उत्तरेतील या तांडवाने या कारणांकडे लक्ष वेधले आहे. पाऊस थांबल्यावर किंवा पूर ओसरल्यावर मदतकार्य गती घेईल, जनजीवन पूर्वपदावर येईल. परंतु, अशी परिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही, यासाठी पावले टाकण्याची गरज आहे.

Back to top button