Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश | पुढारी

Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १० वाजता मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात प्रशासनाने कलम-१४४ लावले आहे.

अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परिसरात तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि या वादाचे पडसाद उमटत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालं असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन ते चार नागरिकही जखमी झाले आहे. या घटनेनंतर सदर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी ही भेट देत अधिकार्‍यांना सूचना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदेश केले. आणि संशयितांवर कारवाईच्या सूचना केल्या. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३२ तरुणांना ताब्यात घेतले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फौजदारी प्रकोया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button