नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ | पुढारी

नाशिक : गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या पूजा भोईरच्या पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित पूजा विशांत भोईरच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या पूजाच्या डी-मॅट खात्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. मात्र, या खात्यावर सेबीने प्रतिबंध आणल्याचे समजते. त्याचप्रमाणे पूजाने लाखो रुपयांचे दागिने गहाण ठेवले असून, पोलिस तिच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करीत आहेत.

शहरातील रहिवासी अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. सिरीनमिडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत पूजासह तिचा पती विशांत विश्वास भोईर (३५, दोघे रा. कल्याण, ठाणे) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पूजाचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ती गुरुवार (दि. ८)पर्यंत पोलिस कोठडीत होती. कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिच्या पोलिस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ केली आहे. पूजाने अनेकांना फसवल्याच्या तक्रारी येत असून, त्यामध्ये नाशिक-मुंबईतील मोठ्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. पूजाने गुंतवणूकदारांना सुमारे ८० लाख रुपये परत केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, काही गुंतवणूकदारांना दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. संशयित दाम्पत्याने ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. या प्रकरणी संशयितांविरोधात नाशिकसह परजिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पूजाच्या बँक खात्यांमध्ये बरेच व्यवहार आढळून आले आहेत. तिचा पती विशांत हा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.

स्थावर मालमत्तेचाही शोध

पोलिसांच्या तपासात पूजाच्या डि-मॅट खात्यात ३ कोटी ३० लाख रुपये आढळून आले. मात्र, हे खाते सेबीने गोठवल्याचे समजते. त्याचप्रमाणे तिने २७ लाखांचे सोने सोनाराकडे गहाण ठेवत २६ लाख रुपये घेतले आहेत. याबाबत संबंधित सोनाराकडेही पोलिसांनी चौकशी केली. संशयितांकडील स्थावर मालमत्तेचाही शोध घेतला जात असून, त्यांचे आर्थिक व्यवहार, विदेशी सहलींचाही तपास केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button