

वारजे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील ढोणे वाडा हॉटेलसमोर ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या खालील मातीचा काही भाग खचल्याने व वाहतुकीस पुरेशी जागा मिळत नसल्याने महामार्ग व सेवा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महामार्गावर रात्री बारापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
महामार्गावर होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, महामार्ग ओढ्यावरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. वाहतूक कोंडी व अन्य कारणांमुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत वारजे सेवा रस्त्यावर तसेच नवले पुलावरील झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 6) वारजे परिसरात मुठा नदी पुलावर दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतरदेखील महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सातार्याच्या दिशेने जाणारी वाहने सेवा रस्त्यावर उतरल्याने वारजे, माळवाडी परिसरासह चांदणी चौकपर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ढोणे वाडा हॉटेलसमोर महामार्गाचा भराव खचल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. यामुळे काही दिवसांसाठी वाहतूक पोलिसांनी महामार्गावरून धावणारी अवजड वाहने आणि खासगी बसच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
महामार्गावर पुलाच्या खालचा मातीचा भाग खचल्याने या ठिकाणी बॅरिगेट्स लावल्याने वाहतुकीची लेन कमी झाली आहे. यासंदर्भात महामार्ग अधिकार्यांशी बैठक झाली असून, येत्या चार ते पाच दिवसांत या ठिकाणी पुलाचे काम पूर्ण होईल. डुक्कर खिंड येथे महामार्गावरून सेवा रस्त्यावर अवजड वाहने उतरू नये, यासाठी वाहतूक पोलिस उभे करण्यात आले आहेत.
-विशाल पवार,
सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग.
हेही वाचा