पुणे : प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद | पुढारी

पुणे : प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कुख्यात गुंडाच्या टोळीतील एका सदस्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. अवैध पद्धतीने रिक्षाचालक म्हणून काम करीत असताना, त्याने एका प्रवाशावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करून दाताने कानाचा लचका तोडला होता. त्याच्या विरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आदेश संजय काळे (वय 39, रा. पर्वतीदर्शन) असे सराईताचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध तीन खुनाचे व इतर चार गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

1 जून रोजी फिर्यादी प्रवासी मूळ गावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आले होते. त्या वेळी भाड्याच्या कारणातून त्यांचा आरोपी रिक्षाचालकासोबत वाद झाला असता, त्याने व त्याच्या साथीदारांनी प्रवाशाला मारहाण केली. त्या वेळी आरोपी काळे याने फिर्यादींवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांनी चुकविला. त्यानंतर काळे याने फिर्यादींच्या कानाचा लचका तोडून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर काळे तेथून फरार झाला होता.

दाखल गुह्याचा तपास करीत असताना, तो बारामती येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिस तेथे पोहोचले असता, तो पुण्याकडे गेल्याचे समजले. त्यानुसार स्वारगेट बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्ष अशोक इंदलकर, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी मुकुंद तारू, शिवा गायकवाड, संदीप घुले, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

पुणे रेल्वे स्थानकावरून महिन्यात 33 मुलांची सुटका

Sidharth Anand : फायटर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बिझी

नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

Back to top button