नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार | पुढारी

नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या कारला पेटवल्याचा प्रकार परिसरात घडला असून, पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल बागूल (36) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार शनिवारी (दि. ३) रात्री ११ ला त्यांची लाल रंगाची कार क्र. एमएच – 15 / एचक्यू 9855 ही ऋचा हॉटेल येथील पार्किंगमध्ये सोहनलाल भंडारी यांच्या ऑफिससमोर उभी केली असता मध्यरात्री 1 च्या सुमारास अज्ञातांनी पेटवल्याची माहिती परिसरात राहणाऱ्यांनी दिली. तर जवळच उभ्या केलेल्या कार क्र. आरजे 45 / सीडब्ल्यू 2639 लाही आग लागलेली होती. कारखाली कोणीतरी टायर पेटवून ठेवलेले होते. बागूल यांनी तत्काळ ग्रामपंचायतीच्या अग्निशामक दलाला फोन केल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दोन्ही पेटलेल्या गाड्या विझविल्या.

ही घटना ऋचा कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यात पिंपळगाव येथील संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गुंग्या राजेंद्र केदारे याने एक टायर पेटवून कार खाली टाकल्याचे दिसत असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

 

 

Back to top button