पिंपरी शहरातील हरित अच्छादन वाढवण्यासाठी ‘डेन्सफॉरेस्ट‘ | पुढारी

पिंपरी शहरातील हरित अच्छादन वाढवण्यासाठी ‘डेन्सफॉरेस्ट‘

वर्षा कांबळे

पिंपरी (पुणे) : सध्या शहरीकरणामुळे हरितपट्टा कमी होत आहे. या परिस्थितीत शहरातील हरित अच्छादन वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे तापमानवाढ रोखणे शक्य होणार आहे. यासाठी निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात साधारण 20 गुंठ्याच्या जागेत विविध प्रकारची देशी झाडे रोपण करून डेन्स फॉरेस्ट म्हणजेच घनवन पद्धतीने 350 ते 400 झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे.

यामध्ये देशी प्रकारातील रोपे समतल चर करून लावली जातात. या मानवनिर्मित देवराईमध्ये 120 ते 130 लहान मोठी रोपे, महावेली, झुडुपे, झाडे, वेली आदींचा यात अंतर्भाव असतो. समतल चर केल्यामुळे झाडांना विशेष फायदे मिळतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घेत वृक्षांचे रोपण करायला पाहिजे. घनवन उपक्रम हा त्याचाच भाग. हिरडा, आवळा, अर्जून, पळस, कुसुंब, कांचन, आपटा, बहावा अशी देशी झाडे यामध्ये प्रामुख्याने रोपण केली जातात.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहर हरित ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. याच हेतूने शहरात विविध सामाजिक संस्था कार्यरत आहे. महापालिकेतर्फे शहरात घनवन साकारून हरितपट्टा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्गाटेकडी पायथा भागात असे घनवन उभारले असून आता मोशी येथे उभारण्यात येत आहे.

असे उभारले घनवन

घनवन उभारण्याचे काम 2021 मध्ये हाती घेण्यात आले. सुरुवातील 15 फुटाचा खड्डा खणून सर्व उद्यानातील पालापाचोळा आणून यामध्ये टाकला. यापासून खतनिर्मिती झाल्यानंतर यावर मातीचा एक थर देण्यात आला आहे. चार बाय चार असे चर करून त्यामध्ये एकाच पद्धतीची चार झाडे लावण्यात आली. यामध्ये जी झाडे हळूहळू वाढतात ती पूर्व व पश्चिम अशी जेणेकरून वेगाने वाढतील. तर दुसरीकडे वेगाने वाढणारी झाडे दक्षिण उत्तर अशी लावण्यात आली आहेत. अवघ्या दोनच वर्षात ही झाडे दहा ते पंधरा फूट वाढली आहेत. याठिकाणी देशी वृक्षांनी परिपूर्ण असे घनवन तयार झाले आहे.

घनवनाचे फायदे

  • झाडांचा अभ्यास करणे सोपे होईल.
  • मुलांना झाडांची माहिती देण्यासाठी सहलींचे आयोजन
  • हरित अच्छादन वाढेल
  • पक्ष्यांना देशी झाडांचा आसरा
  • 5 वर्षांत मिळते सीडबँक

कोठे उभारता येईल घनवन

कोणत्याही मोकळ्या जागेत, उद्यान, विद्यालये, संस्था, हॉस्पिटल यांच्या परिसरात मोकळ्या जागेत

जलशुध्दीकरण केंद्रात जी मोकळी जागा होती त्याठिकाणी हे घनवन उभारण्यात आले आहे. जैवविविधता वाढीसाठी सुरुवातील दुर्गाटेकडीवर वृक्ष संवर्धन करून हरितपट्टा वाढविण्यात आला. अलीकडे पालिका प्रशासनाने हेतूपुरस्सर देशी वृक्षांची लागवड करण्यास सुरुवात केली. त्याचा हा भाग आहे. दुर्गा टेकडीला पूरक अशी जंगलनिर्मिती याठिकाणी आहे.

-धनंजय शेडबाळे,
विश्वस्त, देवराई फाउंडेशन

हेही वाचा

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मतदार यादीवर आक्षेप

बारामतीतील जुन्या वखारीला आग; 75 लाखांचे नुकसान

जुन्नर पर्यटन विकासाला वाटाण्याच्या अक्षता; पाच वर्षांनंतरही ’डीपीआर’ नाहीच

Back to top button