नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण | पुढारी

नाशिक : कोशिंबेत मद्यसाठा जप्त करणाऱ्या पोलिस पथकाला मारहाण

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे घरात साठविण्यात आलेला मद्यसाठा जप्त करण्यास गेलेल्या पोलिस पथकाला वस्तीतील लोकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केली. महिला पोलिसालाही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

कोशिंबेतील एका व्यक्तीच्या घरात देशी-विदेशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी पथक झाडाझडती घेत असताना घरातील व आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी एकत्र येत विशेष पोलिस पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ करत मारझोडही केली. तसेच पथकातील महिला पोलिसासही मारहाण केली. पथकातील पोलिसांची संख्या तोकडी असल्याने लोकांनी पथकाला जोरदार मारहाण केली. याबाबत वणी पोलिस ठाण्यात पथकातील महिला पोलिस ललिता सुरडकर यांच्या तक्रारीवरून सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी घटनास्थळी भेट देत परिसरात तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button