कोट्यधीश श्वान! | पुढारी

कोट्यधीश श्वान!

मित्रा, तुला माहितीये का, की सोशल मीडिया हे एक फार तगडे माध्यम आपले टॅलेंट दाखवण्यासाठी उपलब्ध झाले आहे; पण त्याचबरोबर याच माध्यमातून करमणूक करण्याबरोबरच कमाई पण व्हायला सुरुवात झाली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक या व्हिडीओ प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेकजण लाखो आणि कोट्यवधी रुपये कमवत आहेत. किती तरी हजार फॉलोवर झाले की, त्या व्यक्तीला इन्फ्लुएनसर म्हटले जाते आणि असे जे प्रभाव निर्माण करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वत्र मान असतो. या प्रभाव निर्माण करणार्‍या व्यक्तींच्या मताला फार मोठी किंमत असते.

अरे, पण प्रभाव निर्माण करणार्‍या व्यक्ती राजकारणात होत्या, समाजकारणात होत्या, चित्रपटात होत्या; पण या सोशल मीडियामुळे सगळीकडेच तयार झाल्या आहेत की काय?

नक्कीच. गंमत म्हणजे यात प्राणीही मागे नाहीत. टकर नावाचा एक गोल्डन रिट्रीवर जातीचा पाळीव कुत्रा आहे. त्याची वार्षिक कमाई किती असेल काही अंदाज? थांब, डोळे पांढरे करून घेऊ नकोस. त्याची वार्षिक कमाई तब्बल आठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये आहे. जगभरातील आघाडीच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये म्हणजे, अर्थात सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये टकरचा समावेश आहे. टकरची जी मालकीण आहे, ती त्याचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सांभाळते. तिने दिलेल्या माहितीनुसार यू ट्युबवर टकरचा 30 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केल्यास तीस ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कमाई होते. शिवाय, चार ते पाच इन्स्टाग्राम स्टोरीज तयार केल्यास टकरला 16 लाख रुपये मिळतात. यू ट्युब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कमाईने आठ कोटींचा टप्पा गाठला आहे. कमाल आहे की नाही?

होय तर. यार मला असे वाटत आहे की, असा एखादा कुत्रा पाळावा, त्याला शिकवावे आणि सोशल मीडियावर आणावे आणि चिकार कमाई करावी. ही नोकरी करायची झंझट नको.

असे भाग्यवान श्वान जागोजागी मिळतात, असे वाटले की काय तुला? तसं श्वान प्रेम खूप वाढत चालले आहे, हे आपण पाहतच आहोत. कुठेही जा, विशेषत: शहरात सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी मालक आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला जाताना दिसतात. पर्यटनाला जाताना त्याला घेऊन जातात. श्वानांचे होस्टेल तयार झाले, त्यांचे दवाखाने आलेत, श्वानांचे ब्युटी पार्लर तयार झालेत आणि अक्षरश: लाखो रुपये खर्च करून लोक आपल्या कुर्त्र्यांची काळजी घेतात; पण एखादीच टकरची मालकीण असते जी आपल्या कुत्र्याचा पुरेपूर वापर करून करोडो रुपयांची कमाई करू शकते. ही जी टकरची मालकीण आहे, ती कुठेतरी साफसफाईचे काम करायची. तिचा नवरा सिव्हिल इंजिनियर आहे. टकर साधारणतः तीन महिन्यांचा झाला तेव्हा तिच्या लक्षात आले की, या श्वानामध्ये काहीतरी वेगळे टॅलेंट आहे. ते तिने ओळखले आणि सोशल मीडियावर विविध माध्यमांतून त्याचे अकाऊंट काढले. हळूहळू टकरची लोकप्रियता वाढू लागली. तिने स्वतःची नोकरी सोडून दिली आणि ती पूर्ण वेळ टकरच्या अकाऊंटवर लक्ष केंद्रित करू लागली. असे करता करता टकरने या साध्यासुध्या मालकिणीला चक्क करोडपती बनवले.

पण तू एक लक्षात घे की, ही शक्ती टकरची नाहीये. ही सोशल मीडियाची शक्ती आहे. आता 2024 आली आपल्या देशात लोकसभा आणि इतर निवडणुका होऊ घातल्या आहेत. सोशल मीडियावर आज बर्‍यापैकी जनतेचे मत राजकीय पक्षांबद्दल तयार होत असते. त्यामुळे सगळेच पक्ष सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर टाकलेली अगदी दहा सेकंदांची एखादी क्लिप किंवा रील किंवा स्टोरी क्षणभरात देशभरात नव्हे, तर जगभरात पोहोचते आणि चक्क त्यामुळे लोकांचे मत तयार करता येते.

– झटका

Back to top button