नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे | पुढारी

नाशिक : शहरात उभारणार तब्बल 'इतक्या' ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे.

देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. त्याअंतर्गत शहरी जनतेला छोट्या-मोठ्या आजारांवर तातडीने उपचार मिळावे, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन निधीही उपलब्ध करून देणार आहे. शासनाच्या निधीतून नाशिक शहरात १०६ ठिकाणी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. आरोग्य केंद्रासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

मनपाच्या मिळकत विभागाने जागाही निश्चित केल्या आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या सर्व केंद्रांना एकसारखाच पिवळा रंग दिला जाणार आहे. तसेच केंद्रांच्या भिंतींवर वारली पेंटिंग्ज साकारण्यात येईल. आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी या मिळकतींची देखभाल दुरुस्ती तसेच डागडुजीचे काम मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रांसाठी मनपाला ६५ काेटी ५० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यात १०६ केंद्रांसाठी प्रत्येक २१.५० लाख, फर्निचर व इतर वस्तू खरेदीसाठी तीन लाख, डाॅक्टर मानधनासाठी दरमहा ६० हजार रुपये, स्टाफ नर्ससाठी दरमहा २० हजार, बहुउद्देशीय आराेग्यसेवकास दरमहा १५ हजार रुपये मानधन देण्यात येईल.

सिडको विभागात सर्वाधिक संख्या

महापालिकेने शहरात १०६ आरोग्यवर्धक आरोग्य केंद्र उभारताना सहाही विभागांची लोकसंख्या विचारात घेतली आहे. त्यानुसार सिडको विभागात सर्वाधिक २२ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याखालोखाल पंचवटी विभागात २० केंद्रे असतील. याशिवाय नाशिकराेड विभागात १८, सातपूर विभागात १६, पश्चिम विभागात १४, पूर्व विभागात १६ केंद्रे निश्चित केली आहेत.

हेही वाचा : 

Back to top button