रोज ६ हजार कमवा! जाणून घ्या साऊंड इंजिनिअरिंगमधील करिअर संधी | पुढारी

रोज ६ हजार कमवा! जाणून घ्या साऊंड इंजिनिअरिंगमधील करिअर संधी

अनिकेत प्रभुणे

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण झाले की, प्रत्येकाची पारंपरिक शिक्षण घेण्यात रूची असतेच असे नाही. हल्ली शिक्षणातही विविध प्रगत पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या मनाला रूचतील ते निवडण्याचा वाव त्यातून मिळतोच. हल्लीच्या विद्यार्थ्यांना रूळलेल्या वाटा मोडून जायचे असते त्यासाठी विविध पर्याय ते शोधतात आणि हल्ली महाविद्यालयांमध्येही वेगवेगळे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात, हे सर्व पर्याय अजून मोठ्या प्रमाणावर आपलेसे झाले नसले तरीही करिअर करण्याच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहेत. चर्चित नसलेल्या पण आगळ्या कोर्सेसपैकी एक म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग.

आपण गाणी ऐकतो, रेडिओवरील विविध कार्यक्रम ऐकतो, ध्वनिमुद्रित कार्यक्रमही ऐकतो. काही कार्यक्रमांत अनेकविध आवाज वापरलेले असतात. अर्थात, हे सर्व एकाच वेळी नाही होऊ शकत. कारण, आवाज रेकॉर्ड करून त्यावर बरेच काम केल्यानंतरच आपल्याला परिपूर्ण उत्तम दर्जाचा आवाज असलेला कार्यक्रम ऐकायला मिळतो. आवाज उत्तम दर्जाचा होणे, त्यात विविध वाद्यांचा आवाज मिसळणे ही सर्व कामे केली जातात ती साऊंड इंजिनिअरिंगच्या माध्यमातून. त्यामुळे साऊंड इंजिनिअरिंग हा करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. अर्थात, अजूनही साऊंड इंजिनिअरिंग हा करिअरचा पर्याय म्हणून फारसा रूळलेला नाही. परंतु, आवाजांवर योग्य ते संस्कार करून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच आव्हानात्मक, जबाबदारीचे पण रूचीपूर्ण असते.

साऊंड इंजिनिअरिंगमध्ये विविध आवाज समजून घेणे, हे आवाज रेकॉर्ड करणे, कॉपी करणे, विविध इलेक्ट्रॉनिक मशिनच्या मदतीने मिक्सिंग करून तो ऐकायला तयार करणे आदी सर्व गोष्टींचा समावेश होतो. साऊंड प्रोडक्शनमध्ये आवाज रेकॉर्ड करण्याच्या सेटअपसह रेकॉर्डिंगपर्यंत अनेक गोष्टी सामील असतात. रेकॉर्डिंग करून तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी त्यावर काही संस्कार करावे लागतात किंवा थोडा नीटनेटका करावा लागतो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आवाजाच्या बेसिक्सपासून पोस्ट प्रोडक्शनपर्यंतची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली जाते. या कोर्समधील सैद्धांतिक किंवा लिखित भाग विद्यार्थ्यांना रेकॉर्डिंग आणि प्रोडक्शन समजून घेण्यास मदत करते. तरच साऊंड मिक्सिंग करण्याचे प्रशिक्षण त्यांना आयुष्यात दक्ष कसे राहायला हवे हे शिकवते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावीनंतर मास कम्युनिकेशनमध्ये पदवी असणे किंवा साऊंड इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करणे किंवा ऑडियो अँड म्युझिक प्रॉडक्शनमध्ये पदवी घेणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करताना महाविद्यालयामध्ये विविध प्रकल्पांवर काम करताना याविषयीचा पुरेसा अनुभवही मिळतो.

करिअरचे स्वरूप : साऊंड इंजिनिअर हा आवाजावर प्रक्रिया करून त्याला अंतिम रूप देण्यातील महत्त्वाची भूमिका करत असतो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि चांगल्या संधी हेरून कोणत्याही व्यक्तीला यामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते. साऊंड इंजिनिअरचे काम अत्यंत तांत्रिक असल्याने त्यासाठी दर्जेदार कॉम्प्युटरची कौशल्ये आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाची माहिती तसेच हे तंत्रज्ञान चालवण्यातील नैपुण्य गरजेचे आहे. एक व्यावसायिक दर्जाचा ऑडिओ निर्माण करण्यासाठी ऑडिओ इंजिनिअरला व्हिडीओ टेक्निकल्स, एडिटर्स, परफॉर्मर्स तसेच दिग्दर्शक यांच्याशी संधान साधावे लागते. भारतात नुकतेच डिजिटल इंडिया कॅम्पेन सुरू झाले आहे, या कॅम्पेनने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

अभ्यासक्रम : हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी, आकाशवाणी वाहिन्या, मीडिया प्रॉडक्शन हाऊस, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, ब्रॉडकास्ट मीडिया हाऊसेस, जाहिरात एजन्सी यांच्याबरोबर आपले काम सुरू करू शकतात. या क्षेत्राचा योग्य अनुभव गाठीशी आल्यानंतर स्वतंत्ररीत्या काम करू शकतो. या क्षेत्रातील सुरुवातीचे वेतन प्रतिमहिना 10 हजारच्या आसपास मिळते. कामाची विविधता, अनुभव यानुसार तो वाढत प्रतिमहिना एक लाख रुपयांहूनही अधिक वेतन मिळवू शकतो. टीव्ही आणि फिल्म प्रोडक्शन कंपन्यांबरोबर काम केल्यास रोज 1,500 ते 6,000 हजार रुपये मिळू शकतात. प्रकल्पाच्या आर्थिक गणितांवर वेतनाचा आकडा अवलंबून असतो. एखाद्या आर्थिकद़ृष्ट्या मोठ्या असलेल्या प्रकल्पामध्ये यापेक्षा अधिक रक्कमही मिळू शकते. चित्रपट आणि संगीत या क्षेत्रांमध्ये काम केल्यास अधिकाधिक वाव किंवा संधी मिळू शकतात. शिवाय, आपल्या प्रोफाईलमध्येही सुधारणा होते.

Back to top button